Shirur News: शिरूरमध्ये खळबळ! घोडनदीत शेकडो बिस्किट बॉक्स आणि मॅगी मसाल्यांचा खच…कारण काय?
Shirur News: शेकडो बिस्किटांचे बॉक्स आणि मॅगी मसाल्यांची पाकिटे नदीपात्रात आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप; जलचरांच्या अस्तित्वालाही धोका.

Shirur News – अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने कालबाह्य झालेल्या बिस्किटांचे बॉक्स, मॅगी मसाले आणि इतर खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याजवळील नदीपात्रात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शिरूर शहरात खळबळ उडाली असून नदीपात्रातील पाण्याच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोडनदीवरील बंधार्याजवळ शेकडो बिस्किटांचे बॉक्स,
मॅगी मसाल्यांची पाकिटे तसेच विविध खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर पडलेले आढळून आले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या वस्तूंची मुदत संपलेली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा संपूर्ण माल कालबाह्य झालेला असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. स्थानिकांच्या मते, अन्न व औषध प्रशासनाकडून धाड पडल्यास संबंधित व्यापार्यांवर मोठी दंडात्मक व कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता होती. त्यामुळेच अज्ञात व्यापारी किंवा संबंधितांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हा माल नदीपात्रात टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कालबाह्य अन्नपदार्थ नदीपात्रात टाकल्याने पाण्याचे प्रदूषण होण्याबरोबरच जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच परिसरात दुर्गंधी पसरून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शिरूर परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर कालबाह्य खाद्यसाठा नदीपात्रात टाकल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकारामागील जबाबदार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकशीची मागणी
घटनेची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासन, शिरूर नगरपरिषद तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी. तसेच नदीपात्रात टाकण्यात आलेला संपूर्ण खाद्यकचरा तातडीने हटवून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





