PMC negligence : पुण्यावर पुराचे संकट? नदीपात्रात मेट्रोचा राडारोडा आणि कचऱ्याचे ढीग; प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष
PMC negligence : अतिक्रमणे आणि मेट्रोच्या कामांमुळे पुण्यात पूरस्थितीचा धोका वाढला; एकतानगरी, शिवणे आणि रजपूत झोपडपट्टी परिसराला पुराचा वेढा बसण्याची भीती.

PMC negligence – राज्यात मान्सून दाखल झाला असून, पुढील काही दिवसांत शहरात पावसाळा सुरू होणार आहे. मात्र, असे असतानाही शहरातून जाणाच्या मुठा नदीपात्रात दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात राडारोडा तसेच कचरा पडून आहे. याशिवाय भिडे पुलाच्या परिसरात मेट्रोचे साहित्य आणि पुलाच्या कामासाठी नदीपात्रात करण्यात आलेला भराव तसाच असल्याने नदीतील पाण्यास अडथळे निर्माण होणार असून, पूरस्थितीची समस्या गंभीर होण्याची चिन्हे आहे.
मात्र, महापालिका, पाटबंधारे विभाग आणि महामेट्रोकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून पावसाळ्यापूर्वी महापालिकेस पत्र पाठवित पात्रातील राडारोडा तसेच इतर अडथळे दूर करण्यासाठी सूचना केल्या जातात. मात्र, त्यांच्याकडूनही यंदा कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
म्हणून वाढतो पूरस्थितीचा धोका…
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही धरणे आहेत. यातील तीन धरणांतून खडकवासला धरणात पाणी येते आणि हे पाणी शहराला पिण्यासाठी सोडले जाते. या चारही धरणांची पाणी साठवण क्षमता २९.५० टीएमसी पाण्याची असली तरी खडकवासला धरणाची साठवण क्षमता केवळ १.७२ टीएमसी आहे. त्यातच, शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी या धरणात ५० टक्के पाणी राखीव ठेवावे लागते.

बाबा भिडे पुलाच्या मोरीचे गाळे मेट्रोच्या डेक्कन ते नारायण पेठ जोडणार्या पुलांच्या कामामुळे आवडले गेले आहे.
त्यामुळे पावसाळ्यात हे धरण सर्वात आधी भरते. त्यातच, धरणाची क्षमता कमी असल्याने इतर धरणात कमी पाणी असले तरी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडावे लागते. खडकवासला धरणातून सर्वसाधारणपणे २५ ते ३० हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर डेक्कन तसेच सिंहगड रस्ता परिसरात पूरस्थिती उद्भवत होती.
मात्र, गेल्या काही वर्षांत नदीपात्रात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे तसेच खडकवासला धरणापासून ते डेक्कनपर्यंत अनेक ठिकाणी नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणांमुळे नदीची वहन क्षमता घटली असून, १५ ते १८ हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर भिडेपूल पाण्याखाली जातो. तसेच, पाण्याला फुगवटा निर्माण होऊन रजपूत झोपडपट्टी, कर्वेनगर स्मशानभूमी, एकतानगरी, शिवणेचा काही भागात पूरस्थिती उद्भवते.
मेट्रोने अडविले नदीपात्र….
महामेट्रोकडून नारायण पेठ ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम तीन वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. या कामासाठी नदीत मोठ्या प्रमाणात भराव टाकला आहे. तसेच, या पुलासाठी मोठे लोखंडी जोड पूलावर ठेवले असून, त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी बॅरिकेडस् लावले आहेत. तर पुलाखालून पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या जवळपास १५ मोऱ्यांमधील केवळ ५ मोऱ्या पाणी वाहून जाण्यासाठी शिल्लक राहिल्या आहेत. दहा मोऱ्या राडारोड्यात बुजून गेल्या आहेत.




