Shirur News : सासवड येथील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणेने मिळवले घवघवीत यश

शिरूर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत सासवड येथे दि. २९ व ३० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त विद्यालय, सविंदणे येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेत १७ वर्ष वयोगट मुली कबड्डी संघाने प्रथम क्रमांक, १४ वर्ष वयोगट मुली खो-खो संघाने प्रथम क्रमांक, १९ वर्ष वयोगट मुली कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक तर १४ वर्ष वयोगट मुली कबड्डी संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
मैदानी स्पर्धेत १७ वर्ष वयोगट मुली गोळा फेक या प्रकारात लंघे लावण्या भिमराव हिने सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक पटकावला. १०० मीटर व २०० मीटर धावणे (१७ वर्षे) या दोन्ही प्रकारांत पूर्वा कोळेकर हिने सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळविला. लांब उडी (१७ वर्षे) प्रकारात परिघा लंघे हिने द्वितीय क्रमांक तर २०० मीटर धावणे (१४ वर्षे) प्रकारात सायली इचके हिने द्वितीय क्रमांक पटकावला. शिक्षक गटातही विद्यालयाचा लौकिक कायम राहिला असून सलग दोन वर्षे १०० मीटर धावणे स्पर्धेत नितीन चव्हाण सर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य दौंडकर सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन लंघे, सचिव बाळासाहेब पडवळ, भाजपा नेते बाबासाहेब लंघे, श्रमिक रामदास बँकेचे खजिनदार भिमरावलंघे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. खेळाडूंना प्राचार्य, क्रीडा शिक्षक, तसेच नितीन चव्हाण सर व अध्यक्ष अर्जुन लंघे यांनी मार्गदर्शन केले. या यशासाठी बाळासाहेब भोर यांचे विशेष सहकार्य लाभले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श माजी सरपंच वसंत पडवळ, बाळासाहेब भोर, डॉ. भिमराव लंघे व बाळासाहेब पडवळ यांनी रोख स्वरूपाचे बक्षीस जाहीर केले आहे. या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून श्री गुरुदेव दत्त विद्यालयाचे अभिनंदन होत आहे.





