Shirur News – नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरूर-आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करत भाजपने तीनपैकी दोन जागा हस्तगत केल्या आहेत. पाबळ गटात भाजपला यश मिळाले नसले तरी, येथील रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी पराभूत उमेदवारांनी पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी भाजप नेत्या जयश्री पलांडे, विकास गायकवाड आणि दीपक खैरे यांनी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला असून, या माध्यमातून ग्रामीण भागात भाजप आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या २० वर्षांपासून या भागातील पाणीप्रश्न प्रलंबित आहे. निवडणुकीदरम्यान मंत्र्यांच्या सभांचे नियोजन आणि मतदारांपर्यंत हा मुद्दा पोहचवण्यात आलेल्या त्रुटींमुळे पाबळ गटात अपेक्षित मते मिळाली नाहीत. मात्र, आता पराभवानंतरही कॉन्फरन्स मीटिंगच्या माध्यमातून विखे पाटील यांनी पाबळला भेट देण्याचे आणि पाणीप्रश्न सोडवण्याचे पुनरुच्चार केले आहे. यामुळे जनतेला एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. विशेषतः २०२८ मध्ये होणारी मतदारसंघाची पुनर्रचना लक्षात घेता, शिरूरमधील गावे पुन्हा मूळ तालुक्याला जोडली जाणार का? किंवा नवा तालुका अस्तित्वात येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हीच अनिश्चितता भाजपसाठी या भागात राजकीय वाव निर्माण करणारी ठरत आहे. जिल्हा परिषद पुणे विकास प्रक्रियेवर भर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून जयश्री पलांडे यांनी व्यूहरचना करूनही, मतदारांना आश्वासक परिस्थिती निर्माण करून देण्यात यश आले नाही. तरीही पाणीप्रश्न हे एक हिमनगाचे टोक असणार असून, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे विकास गायकवाड व दीपक खैरे यांच्यासारखे विकास प्रक्रियेत आस्था असणारे कार्यकर्ते भाजपला मिळाले. हीच जमेची बाजू हाताशी घेऊन या भागात अनेक विकास योजना राबवून, भाजपबद्दल आश्वासक परिस्थिती निर्माण करण्याचे काम या निमित्ताने सुरू झाले आहे. पक्षनिष्ठेवर भाजपचा कटाक्ष दरम्यान सध्याच्या राजकारणात कोणते पक्ष युतीत, कोणते कार्यकर्ते कोणत्या पक्षात हा भेदभाव संपला असला तरी भाजपने राज्याच्या राजकारणात योग्य ते कार्यकर्ते खेचून नेतृत्वात यश मिळवले आहे. हीच बाब आता या भागात होणार असल्याने, भाजप पक्षाच्या माध्यमातून स्थिर झालेले मात्र भाजपला सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना कायमचा बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, अशी भूमिका घेतली जाणार असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पडसाद उमटणार याची चुणूक येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून दिसण्याची शक्यता आहे. अशा पक्ष सोडून गेलेल्या भाजपच्या माध्यमातून अस्तित्वाला आलेल्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत जागा दाखवली जाईल, अशी माहिती भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. यामुळे पाबळ गटातून झालेला पराभव भाजपचा प्रतिष्ठेचा प्रश्न झाल्याची बाब पुढे आली आहे.