Shirur News – शिरुर तालुक्यातील राजकारणात एकेकाळी प्रभावशाली असलेले माजी आमदार (स्व) बाबूराव पाचर्णे यांनी दबदबा निर्माण केला होता. मात्र, पाचर्णे यांच्या पश्चात राहुल पाचर्णे, मालतीताई पाचर्णे यांना हे संघटन मजबूत करता आले नाही. गेल्या पाच वर्षांत तालुक्यात राजकीय स्थित्यंतरे घडली असताना भाजपचे संघटन कमकुवत झाल्याने शिरूर ग्रामीण- न्हावरे जिल्हा परिषद गटातील निकालातून दिसून आले. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपकडून बळ मिळाले असताना त्याचा फायदा पाचर्णे परिवाराला उठवता आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून भाजपाला आत्मचिंतनाची गरज आहे, असा सूर भाजपच्या निष्ठावंत समर्थकांमधून उमटत आहे.२०१२ मध्ये शिरुर ग्रामीण – रांजणगाव गणपती गटात राहुल पाचर्णे यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर पाचुंदकर यांचा पराभव करीत जिल्हा परिषदेला विजय मिळवला होता. मात्र, त्या विजयाला नातेसंबंधांची भावनिक किनार लाभल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत लोकनेते आमदार (स्व) बाबुराव पाचर्णे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे एक भावनिक लाट निर्माण झाल्यामुळे राहुल पाचर्णे यांचा मार्ग सुकर झाला, अशी त्यावेळी चर्चा होती. यानंतर झेडपी गट आणि पंचायत समितीच्या गणांची पुनर्रचना झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. २०१७ आणि २०२६ या दोन्ही निवडणुकांमध्ये राहुल पाचर्णे तसेच मालती पाचर्णे यांना स्वतःच्या शिरुर ग्रामीण-न्हावरे या बालेकिल्ल्यातच पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषद पुणे सलग दोन पराभवामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय त्यांच्या पक्षाशी निष्ठावान मानले जाणारे काही कार्यकर्तेच आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेऊन रिंगणात उतरल्याने संघटनात्मक एकजूट ढासळल्याचे चित्र दिसून आले.शिरुर पंचक्रोशीत पंचायत समितीसाठी दमदार उमेदवार उभा करण्यात अपयश आल्याचाही फटका बसल्याचे बोलले जात आहे. एकेकाळचा राजकीय प्रभाव, नातेसंबंधांवर आधारित समीकरणे आणि सध्याची वास्तव परिस्थिती यामध्ये मोठी दरी निर्माण झाल्याने राहुल पाचर्णे यांनी पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी गंभीर आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याची कार्यकर्ते व राजकीय निरीक्षकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.भारतीय जनता पक्ष आता आत्मपरीक्षण करणार का, पक्षाअंतर्गत मतभेद अधिक उफाळून येणार याकडे लक्ष लागले आहे. अवघ्या ५६ मतांचा हा फरक छोटा असला, तरी त्याचे राजकीय परिणाम मोठे असणार आहेत. याचे भान भाजपने ठेवणे गरजेचे आहे. मतदार शांत असतो, पण निर्णय घेताना धारदार असतो, हेच शिरूरच्या गटातील निकालावरून स्पष्ट झाले आहे.शिरुर – हवेली मतदारसंघात दोन वेळा आमदारकी भूषवलेल्या लोकनेते स्व. बाबूराव पाचर्णे यांच्या नावाचा करिष्मा, वर्षानुवर्षे उभी केलेली संघटना पण जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा अवघ्या ५६ मतांनी झालेला पराभव हा केवळ आकडा नाही. तो पाचर्णे घराण्याच्या राजकीय वर्चस्वाला बसलेला जोरदार धक्का मानला जात आहे. या पराभवातून बोध घेत संघटन बांधणीवर भर देण्याची गरज आहे. शिरुर तालुक्यात आमदार स्व बाबुराव पाचर्णे यांनी गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले होते. ते दोन वेळा भाजपाच्या उमेदवारीवर आमदार झाले होते. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असतानाही स्थानिक पातळीवर मात्र ‘भाजपा’ च्या कार्यकर्त्यांतील नाराजी, अंतर्गत कुरबुरी आणि काही ठिकाणी ‘मूक बंड’ याचा थेट फटका बसल्याने नवख्या उमेदवारासमोर अवघ्या ५६ मतांनी मालती पाचर्णे यांचा पराभव झाला आहे. विरोधकांची शांत रणनीती, पाचर्णेंची ढिलाई विरोधकांनी कोणताही गाजावाजा न करता काटेकोर नियोजन केले. प्रत्येक मतदाराशी संपर्क, शेवटच्या क्षणापर्यंत मतांची जुळवाजुळव आणि बूथनिहाय गणित पक्के केले. त्याउलट पाचर्णे समर्थकांकडून अतिआत्मविश्वास आणि शेवटच्या टप्प्यातील सुस्तपणा महागात पडल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री स्व अजित पवार यांच्या निधनाने जी सहानुभूतीची लाट तयार झाली. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला झाला आहे.