Satara Zilla Parishad – जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून भाजपने वर्चस्व मिळवले. त्यासाठी राजकारणातील शक्य आणि अशक्य वाटणारे सर्व पैतरे भाजपने वापरले. ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तांतराचे मास्टरमाईंड होते. सगळ्या घडामोडींमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नंतर सभापती निवडीत मंत्री गोरेंनी त्यांच्या मतदारसंघात एकही पद घेतले नाही. सत्ता मिळवताना त्यागाची भावनाही त्यांनी दाखवली. भाजपसाठी जिल्ह्यात समतोल साधताना विरोधी प्रस्थापितांना झटका देण्याचे इप्सित त्यांनी साध्य केले. आगामी विधानसभा निवडणूक ध्यानात घेऊन त्यांनी दूरदृष्टीचा मास्टरस्ट्रोकही खेळला आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ ३३ असताना भाजपकडे सुरुवातीला स्वतःचे २७ आणि अपक्ष एक असे २८ संख्याबळ होते. सातारा जिल्हा परिषद विरोधात एकवटलेल्या शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३७ सदस्यांचे बहुमत होते. हे तिन्ही पक्ष राज्यात महायुती म्हणून एकत्र सत्तेत आहेत. आम्ही सर्वात मोठा पक्ष असल्याने आमचाच अध्यक्ष होणार हे विधान करुन जयकुमार गोरे सुरुवातीपासून भाजपचे मनसुबे किती मजबूत आहेत हे वारंवार जाणवून दिले होते. सत्तास्थापनेसाठी अशक्य असणारे गणित सोडविण्याची तयारी ना. गोरे आणि ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केली होती. खरे तर जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच या दोघांनी विरोधकांच्या कंपूत भाजपचे मोहरे घुसवले होते. अशा मोहऱ्यांना निवडून आणायलाही भाजपने मदत केली होती. अशक्य ते शक्य करुन दाखवत भाजपने आपले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विराजमान केले. अध्यक्षपदी आ. महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे तर उपाध्यक्षपदी ना. शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक राजू भोसले यांची निवड झाली. त्यानंतर विषय समिती सभापतींच्या निवडीवेळी पुन्हा एकदा लुटूपुटूचा ड्रामा झाला आणि सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या. सभापती निवडताना मंत्री जयाभाऊंचे निर्विवाद वर्चस्व दिसूनही आले. मात्र, त्यांच्या माण- खटाव मतदारसंघात एकही सभापतीपद न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अध्यक्षपदासह खटाव तालुक्यात दिलेली दोन सभापतिपदे ना. गोरेंच्या मतदारसंघात येत नाहीत. शिवेंद्रसिंहराजे भोसले इतर दोन सभापतिपदे वाई आणि खंडाळा तालुक्यात देण्यात आली आहेत. सत्तास्थापनेत संपूर्ण समर्पण देत धुरंधर ठरलेल्या ना. जयाभाऊंनी माण- खटाव मतदारसंघात एकही पद न घेता त्यागाची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. सर्व सभापतिपदे त्यांच्या मतदारसंघाबाहेरील असूनही त्यांचीच असल्याने ना. जयकुमार गोरे यांचे नेतृत्व जिल्हाभर प्रस्थापित झाले असल्याचे सिद्ध झाले आहे. टीमचे पाठबळ ठरले महत्त्वाचे…. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वंकष पाठबळ दिल्याने ना. शिवेंद्रसिंहराजे आणि ना. जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलवले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम, आ. मनोज घोरपडे, पडद्यामागून आ. महेश शिंदे, माजी आमदार मदन भोसले अशी दमदार टीम भाजपमध्ये कार्यरत असल्याने भाऊ, बाबा, दादांची टीम जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधक धुरिणांना भारी पडली आहे.