शिरूर : गुटखा-पानमसाला साठ्यावर मोठी कारवाई; 1.11 लाखांचा मुद्देमाल जप्त
crime news : महाराष्ट्र शासनाने गुटखा, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण व विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.

शिरूर : महाराष्ट्रात बंदी असतानाही सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाल्याचा साठा करून विक्री करणाऱ्या व्यक्तीवर शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1,11,162 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे (वय 44 वर्षे) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हणून संदीप भानुदास घोडे (वय ४०, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) याचे नाव समोर आले आहे.
पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने दि. २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता टाकळी हाजी येथे छापा टाकला. यावेळी विविध कंपन्यांचे गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान रजनीगंधा, विमल, आरएमडी, रॉयल, हिरा आदी ब्रँडचे पॅकेट्स व बॉक्स जप्त करण्यात आले.
जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत दोन वेगवेगळ्या पंचनाम्यांनुसार अनुक्रमे 41,301 व . 69,861 रुपये इतकी असून एकूण किंमत 1,11,162 रुपये इतकी आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने गुटखा, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण व विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. तरीही आरोपीने बंदी असलेला माल साठवून विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटिंग हे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात गुटखा-पानमसाल्याच्या बेकायदेशीर व्यापारावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा:





