Shirur Crime : पाबळमध्ये दिवसाढवळ्या चोरीचा थरार! घरमालक लग्नाला गेले अन् चोरट्यांनी घरच साफ केलं
Shirur Crime : मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील दागिन्यांवर डल्ला; शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

Shirur Crime – पाबळ (ता. शिरूर) येथील थापेवाडी परिसरात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, थापेवाडी येथील रहिवासी रोहिदास मच्छिंद्र मोरे (वय ६०) हे सकाळच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून शेजारीच असलेल्या एका लग्नकार्यासाठी गेले होते.
सायंकाळी सहाच्या सुमारास ते घरी परतले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात प्रवेश करून पाहिले असता कपाट उघडे असून आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. रोहिदास मोरे यांनी कपाटाची अधिक पाहणी केली असता, कपाटात ठेवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.
या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत रोहिदास मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष शेळके हे करत आहेत.





