Shirur Crime : बेट भागात चोरट्यांचा धुमाकूळ! दोन दिवसांत चार ठिकाणी लूटमार, नागरिकांमध्ये भीती

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – तालुक्यातील कवठे येमाई, सविंदणे आणि टाकळी हाजी परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी दहशत माजवली आहे. केवळ दोन दिवसांत (दि. ४ व ५) चार वेगवेगळ्या चोरी व लुटीच्या गंभीर घटना घडल्याने ‘बेट’ भागात भीतीचे सावट पसरले आहे. यामध्ये तीन वृद्ध महिलांना लुटण्यात आले असून, एका दाम्पत्यावर हल्ला करण्यात आला आहे.शनिवारी (दि. ४) दुपारी पहिली घटना माळवदेवस्ती (कवठे येमाई) येथे घडली. गुरे चारत असलेल्या पुर्णाबाई पडवळ (७७ वर्षे) यांना दोन मोटारसायकलस्वारांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटले.
चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८.५ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि ६ ग्रॅम वजनाचा दागिना हिसकावून घेतला. पुर्णाबाईंनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबले, मात्र त्यांच्या आरडाओरडामुळे चोरट्यांनी मिडगुलवाडीच्या दिशेने पळ काढला.यानंतर सायंकाळी पाचच्या सविंदणे येथे रस्त्याच्या कडेला बसलेल्या सीताबाई बाळासाहेब पोखरकर या महिलेच्या गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मणी हिसकावून दोन चोरटे पसार झाले.
त्याच रात्री कवठे येमाई येथील ढाकीवस्ती नजीक वास्तव्यास असलेल्या नाथा भगवंत वागदरे आणि त्यांची पत्नी लीलाबाई वागदरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी या दाम्पत्याला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. यात लीलाबाईंना डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. मारहाण केल्यानंतर चोरट्यांनी ११ शेळ्या, ४ करडे आणि रोख रक्कम असा ऐवज घेऊन पळाले.रविवारी (दि. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास टाकळी हाजी गावातील कुंड रस्त्यावर दोन चोरटे ताराबाई तबाजी मंदिलकर या वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पळाले.
या सलग घटनांमुळे शिरूर तालुक्यातील बेट भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून पोलीस गस्त वाढवून चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक दिलीप पवार आणि पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे.





