Pune District : टाकळी हाजी, म्हसे टेल भाग पाण्याविना
Pune District : सध्या कालव्याच्या तळाशी पाणी सुरू असून, पाण्याचा दाब कमी असल्याने पाणी संथगतीने पुढे सरकत आहे.

टाकळी हाजी : मीना शाखा कालव्याचे खरीप २०२६ चे आवर्तन (दि.३) सप्टेंबरपासून सुरू झाले. हे आवर्तन टेल टू हेड पद्धतीने सुरू करण्यात आले असतानाही पंधरवडा उलटला तरी टाकळी हाजी, म्हसेसह टेल भागातील शेतकऱ्यांना अद्याप पाण्याची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारल्याने पिके जळू लागली असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
बाजरी, सोयाबीन, डाळिंब, फळबागा तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी सध्या पाण्याची गरज आहे. पावसाअभावी विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे मीना कालव्याचे आवर्तन टेल भागापर्यंत पोहोचल्यास पिकांना पाणी मिळण्याबरोबरच विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
सध्या कालव्याच्या तळाशी पाणी सुरू असून, पाण्याचा दाब कमी असल्याने पाणी संथगतीने पुढे सरकत आहे. याच दाबाने पाणी सोडले जात राहिल्यास आवर्तनाचा कालावधी वाढूनही टेल भागापर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. टाकळी हाजी शाखेअंतर्गत आठ पाणी वापर संस्था असून, या सर्व संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी पाण्याची मागणी करीत आहेत.
(दि.१०) रोजी टाकळी हाजी शाखेत शाखाधिकारी के. एस. वडमारे व संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पाण्याची मागणी व नियोजन केले होते. मात्र, अद्यापही टाकळी हाजी शाखेला अपेक्षित पाणी मिळालेले नाही. उपअभियंता सचिन शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधून टाकळी हाजीसह टेल भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी मागणी केली जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य प्रकाश वायसे यांनी दिली.





