Shirur Crime : मलठणमध्ये चोरांचा ‘हायटेक’ डल्ला! ट्रॅक्टर, ट्रक अन् पोकलेनच्या बॅटऱ्या लंपास; नेमकं काय घडतंय?
Shirur Crime : केबल आणि शेतीपंपाच्या चोरीनंतर आता बॅटरी चोरांचा धुमाकूळ; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Shirur Crime – शिरूरच्या बेट भागात शेतीपंप आणि केबल चोरीच्या सत्रानंतर आता वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. मलठण येथील शिंदेवाडी परिसरात शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर, ट्रक आणि पोकलेन मशीनमधील बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रप्रकरणी यमराज शिंदे (रा. शिंदेवाडी, मलठण) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,
सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी यांच्या विहिरीच्या कामासाठी ट्रॅक्टर, ट्रक आणि पोकलेन मशीन उभी करण्यात आली होती. ९ मार्च २०२६ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी उभ्या वाहनांच्या बॅटऱ्या पळवून नेल्या. यामध्ये ट्रॅक्टरमधील ८ हजार रुपये किमतीची, ट्रकमधील ९ हजार रुपये आणि पोकलेन मशीनमधील दोन बॅटऱ्या असा एकूण चार बॅटऱ्यांचा समावेश आहे.
१० मार्च रोजी सकाळी कामासाठी गेल्यानंतर हा चोरीचा प्रकार लक्षात आला. या घटनेचा प्राथमिक तपास शिरूर पोलीस करत असून परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती घेतली जात आहे. शेतातील कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या कामातही अडथळा निर्माण झाला आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या चोरीच्या सत्रामुळे ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी कडक पाळत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
आधीच विद्युत शेतीपंप, केबल आणि रोहित्रांमधील तांब्याची तार चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकरी बेजार झाले आहेत. आता थेट शेतात उभी असलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मलठणसह शेजारील कवठे यमाई गावातूनही अशाच प्रकारे वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.





