Pune District : मलठण केंद्र शाळेत रंगला ‘आठवडा बाजार’ ; चिमुकल्यांनी अनुभवले खरेदी-विक्रीचे व्यवहार
Pune District : पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या या बाजाराला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.

शिरूर : मलठण ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मलठण व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘आठवडा बाजार’ व ‘आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या या बाजाराला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विविध स्टॉल्स लावले होते. यात प्रामुख्याने ताजी मेथी, कोथिंबीर, शेपू यांसारख्या पालेभाज्या, फळे, तसेच घरगुती तयार केलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. मुलांनी स्वतः वजनकाटा हाताळणे, पैशांचा हिशोब करणे आणि ग्राहकांशी संवाद साधणे अशा गोष्टींमधून व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले.
शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ वाव्हळ यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी व्यावसायिक कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण होतो. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





