Shirur Crime : शिरूर हादरवणारे ‘ते’ खून प्रकरण! सहा वर्षांनंतर पतीची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा मोठा निकाल
Shirur Crime : शिरूर पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र टिकले नाही; ११ साक्षीदार तपासूनही आरोपीच्या बाजूने लागला निकाल.

Shirur Crime – २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गायकवाड यांची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी पुराव्यांमधील विसंगती आणि कायदेशीर त्रुटींचा विचार करून हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. आरोपी दत्तात्रय गायकवाड याने पत्नी सारिका हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने तिचा गळा कापून खून केल्याचा आरोप फिर्यादीत ठेवण्यात आला होता.
घटनेनंतर आरोपी स्वतः शिरूर पोलीस ठाण्यात हजर झाला होता, ज्यामुळे त्या वेळी मोठी खळबळ उडाली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. काबुगडे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले. मात्र, हा गुन्हा आरोपीनेच केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली ‘परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी’ न्यायालयासमोर उभी करता आली नाही.
न्यायालयाने निकाल पत्रात नमूद केले की, कोणताही गुन्हा ‘वाजवी शंकेपलीकडे’ सिद्ध होणे अनिवार्य असते. या प्रकरणात सादर केलेले पुरावे त्या निकषावर उतरत नसल्याने आरोपीला ‘संशयाचा फायदा’ देऊन मुक्त करण्यात आले. आरोपीच्या वतीने अॅड. जयसिंग पडवळ, अॅड. उदय सरोदे आणि अॅड. अभिषेक बाफणा यांनी बाजू मांडली.
त्यांनी तपासातील त्रुटी, पुराव्यांमधील विसंगती आणि परिस्थितीजन्य पुराव्यांतील अपूर्णता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. निकालानंतर प्रतिक्रिया देताना अॅड. उदय सरोदे म्हणाले की, “न्यायालयाने पुरावे आणि कायदेशीर बाबींचा सखोल विचार करून हा निर्णय दिला आहे. प्रत्येक निरपराध व्यक्तीला न्याय मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार असून, हा निकाल न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेचे उत्तम उदाहरण आहे. या निकालामुळे न्यायालयीन प्रक्रियेत प्रत्यक्ष आणि भक्कम पुराव्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





