Shirur Crime News: टाकळी हाजी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
Shirur Crime News: तक्रार दाखल होऊ नये म्हणून आरोपीकडून वारंवार दबाव टाकण्यात आल्याचा आरोप

शिरूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकासह त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह एकूण आठ जणांविरुद्ध तसेच अन्य १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे टाकळी हाजी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ अंतर्गत कलमांसह गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Shirur Crime News)
फिर्यादीनुसार, जून २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत मुख्य आरोपीने अल्पवयीन मुलीच्या कमी वयाचा व अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्याशी लग्न करणार नसल्याची धमकी देऊन तिला गप्प ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलीसांत तक्रार दाखल होऊ नये म्हणून आरोपी पक्षाकडून वारंवार दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी रात्री टाकळी हाजी येथे फिर्यादी यांच्या घरी दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. (Shirur Crime News)
बैठकीदरम्यान मुलीवरील कथित अत्याचाराबाबत जाब विचारल्यानंतर आरोपी पक्षातील व्यक्तींनी फिर्यादी कुटुंबाला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत फिर्यादी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा:
Pranit More: “‘लोक मला स्वीकारतील की नाही…’; भीती व्यक्त करत मंचावरच रडला प्रणित मोरे”





