Shirur Crime : शिरूरमध्ये सैनिक संघटनेच्या अध्यक्षावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
Shirur Crime:

Shirur Crime : शिरूर येथील एका २७ वर्षीय विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून राहुल साहेबराव वाळके (रा. करडे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराच गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित महिलेशी ओळखीचा फायदा घेत काही पोलिसांशी आपले जवळचे संबंध असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या पतीच्या कथित संबंधांची माहिती देण्याचे आमिष दाखवत आरोपीने तिला नगरच्या दिशेने नेऊन राळेगणसिद्धी परिसरातील एका लॉजमध्ये नेले. तेथे महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिला धमकावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. ही घटना २९ मे २०२६ रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपीने ‘ओम तसत फीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी स्थापन करून संबंधित महिलेला तेथे नोकरी दिल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीत दोन पोलिसांची पार्टनरशिप असल्याचीही चर्चा सुरु असून सखोल चौकशी करून त्यांची भूमिका तपासण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत सोळुंके करीत असून प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.





