Shirur APMC Election: शिरूर बाजार समितीत राजकीय भूकंप; ‘हे’ ३ बडे नेते एकत्र येत महायुतीला देणार आव्हान
Shirur APMC Election: शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय गणिते बदलली; विचारधारेपेक्षा वैयक्तिक समीकरणांना महत्त्व आल्याने सर्वपक्षीय नाराजीचा स्फोट.

Shirur APMC Election – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा विचारधारेपेक्षा राजकीय गणिते, पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक समीकरणे आणि कार्यकर्त्यांपेक्षा पैशाला प्राधान्य दिल्याच्या चर्चेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र आल्याने अनेक इच्छुकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागले.
परिणामी तिन्ही पक्षांत नाराजीचा भडका उडाला असून त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर होणार असल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये अनेक जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारी न मिळाल्याने अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत (अजित पवार) गेलेले दामूअण्णा घोडे यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
त्यानंतर अजित पवार गटाकडून बाजार समिती निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना संधी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा अशोक पवार (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यासोबत हातमिळवणी करीत आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. दुसरीकडे, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून विजयी झालेले राजेंद्र गावडे आणि माजी आमदार पोपटराव गावडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
वळसे पाटील यांच्याशी फारकत घेऊन मतभेद झाल्याच्या चर्चा रंगत असतानाच दोन्ही पिता-पुत्र विविध कामांसाठी अजूनही वळसे पाटील यांच्या संपर्कात असल्याने तालुक्यात “नेमकं चाललंय तरी काय?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील राजकीय घडामोडींनंतर आमदार माऊली कटके यांच्याशी मतभेद झाल्याने राहुल पाचर्णे नाराज असल्याचे बोलले जात होते.
आता दामूअण्णा घोडे, अशोक पवार आणि (स्व) माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे सुपुत्र राहुल पाचर्णे हे तिघे एकत्र येत महायुतीला थेट आव्हान देणारे स्वतंत्र समीकरण उभे करीत निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे.
निकष धनदांडग्यांसाठी पोषक
दरम्यान, महायुतीने उमेदवारी देताना आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना अधिक प्राधान्य दिल्याची चर्चा गावागावात रंगली आहे. विशेषतः कारेगाव-रांजणगाव परिसरातील उमेदवारांना अधिक संधी मिळाल्याने तालुक्यातील पूर्व – पश्चिम भागातील कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. छोट्या गावांतील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा सूरही उमटत आहे.
त्यामुळे निवडणुकीत “पैशाची ताकद जिंकणार की मतदारांचा कौल?” याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पक्षीय निष्ठा, विचारधारा, जुने कार्यकर्ते बाजूला पडत असल्याची भावना तळागाळात निर्माण झाली असून त्याचा फटका कोणाला बसतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.






