Ranjangaon Rain: रांजणगाव गणपती, कोंढापुरी तसेच परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. खंडाळा माथा आणि कोंढापुरी परिसरात पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन काळ्या ढगांनी आकाश व्यापले. त्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने रस्त्याकडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही घडल्या. वाहतुकीचा वेग मंदावला – खंडाळा माथा परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचल्याने काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला. विशेषतः दुचाकीस्वारांना अडचणींचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांनी दुकानांचे शेड, पेट्रोल पंप आणि इतर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. दरम्यान, या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही भागांत पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.