Mumbai Municipal Corporation Election : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला सुरूवात झाली असून, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे पक्षाने चांगलाच जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या या महापालिकेत भाजप आणि शिवेसना शिंदे पक्षात जागावाटपावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. अखेर मोठ्या संघर्षानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ९० जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. निवडणुकीसाठी अवघे १४ दिवस शिल्लक असून उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. यासाठी शिंदेंनी कोकणातील शिलेदारांना मैदानात उतरले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे वर्चस्व असलेल्या भागांमध्ये लक्ष केंद्रित केले असून कोकणातील शिलेदार निलेश राणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. उमेदवारांसाठी स्टार प्रचारक म्हणून निलेश राणे मैदानात असणार आहेत. याशिवाय उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, रोजगार मंत्री भरत गोगावले हे बडे नेते देखील उमेदवारांसाठी निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी युती केली असून, लवकरच त्यांची सभा पार पडणार आहे. तसेच वचननामा देखील सभेतून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अशातच निलेश राणे यांच्यावर ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी, लालबाग, परळ, माहीम या प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निलेश राणे यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवण्याचे कारण म्हणजे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत कोकणात शिवसेनेला मिळालेला विजय. निलेश राणेंनी सुरुवात केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपला जेरीस आणत मालवण आणि कणकवलीत निलेश राणे यांनी पक्षाला मोठं यश मिळवून दिले. त्या यशामुळेच त्यांच्यावर मुंबई निवडणुकीसाठी शिंदेंनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील प्रचारासाठी निलेश राणे यांनी कंबर कसली असून, ठाकरेंचे वर्चस्व असलेला भाग पिंजून काढायला सुरूवात केली आहे. शिवडी, लालबाग, परळ, माहीम या परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी निलेश राणे प्रयत्नांची परिकाष्ठा करताना दिसत आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कशा पद्धतीने सभा होणार? महायुती या निवडणुकीत कशा प्रकारे समतोल राखणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Sonali Bendre Birthday: सोनाली बेंद्रेच्या सौंदर्यावर राजकारणी ते क्रिकेटर फिदा, वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत