Prashant Jagtap : शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. ऐन महापालिका निवडणुकीत जगताप यांच्यासारख्या नेत्याने शरद पवारांची साथ सोडल्याने हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे प्रशांत जगताप काँग्रेस पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एक मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. आज जगताप यांचा काँग्रेस पक्षात पक्ष प्रेवश होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना शिवसेना ठाकरे गटाने देखील मोठी अॅाफर दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश दुपारी १२ वाजता टिळक भवनला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना गुरूवारी रात्री उशिरा फोन केला होता. दोघांमध्ये ९ मिनिट चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू, अशी अॅाफर प्रशांत जगताप यांना देण्यात आली आहे. तसेच उबाठा गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. पण मी काँग्रेस विचारांचा आहे त्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, असे जगताप यांच्याकडून सांगण्यात आले आहे. भाजप सरकारला आव्हान देऊ शकतात, महायुती सरकारला आव्हान देऊ शकता, अशा पक्षाची निवड मी करेन, अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतले आहे. पुढील दोन ते तीन तासांत मी निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जातात की ठाकरेंची मशाल हाती घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? माझ्यासारख्याशी फोनवर साडेनऊ मिनिटांची वेळ देणे, ही माझ्या आयुष्यातील कायमस्वरुपी आठवण आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. पुण्याच्या भल्यासाठी तुम्ही आमच्यासोबत काम करु शकता, असे उद्धव साहेबांनी सांगितले. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. शिंदेंनेही साधला संपर्क मिळालेल्या माहिनुसार, शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांनी बोलणे टाळले असून यावरून दोन्ही शिवसेना प्रशांत जगताप यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु, ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी शक्यता आहे. हेही वाचा : शेअर बाजाराची नकारात्मक सुरुवात ; सेन्सेक्स ७५ अंकांनी तर निफ्टीही घसरण