Shilpa shirodkar: ‘या’ अभिनेत्रीची दमदार एंट्री ! जटाधरा चित्रपटातील खतरनाक लूक चर्चेत

Shilpa shirodkar: एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आता मोठ्या पडद्यावर कमबॅक करते आहे. ‘जटाधरा’ या पौराणिक थ्रिलर चित्रपटातून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तिचा खतरनाक लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
‘जटाधरा’ या सिनेमात सोनाक्षी सिन्हा देवीच्या भूमिकेत असून, सुधीर बाबू नायक आहे. चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात सोनाक्षीचा रुद्रावतार दाखवला गेला आहे. आता चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलं असून त्यातून शिल्पा शिरोडकरची एंट्री झाली आहे.
या पोस्टरमध्ये शिल्पा काळी साडी नेसून हवनकुंडाजवळ उभी दिसते. ज्वाला पेटलेल्या पार्श्वभूमीवर तिचा चेहरा, जीभ बाहेर काढलेली भेदक नजर, आजूबाजूला कवट्या आणि हाडं, अशा रूपातली शिल्पा प्रेक्षकांना घाबरवणारी ठरत आहे. तिच्या या लूकवरून ती सिनेमात मांत्रिकासारखी भूमिका साकारतेय, अशी चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटात ती ‘शोभा’ नावाचं पात्र साकारते आहे, जे स्वार्थ आणि लोभासाठी कोणत्या टोकाला जातं याचं चित्रण करतं.
शिल्पा शिरोडकरने ९० च्या दशकात गोविंदा, चंकी पांडे यांच्यासारख्या अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं. पण गेल्या काही काळापासून ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती. त्यामुळे तिचा हा कमबॅक चाहत्यांसाठी मोठं आकर्षण ठरत आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन शिविन नारंग यांनी केलं असून निर्मिती प्रेरणा अरोरा यांची आहे. ‘परी’, ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ यांसारखे चित्रपट त्यांनी आधीही केले आहेत. या वर्षाखेरीस ‘जटाधरा’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
सध्या शिल्पाच्या या भीतीदायक लूकवर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि तिच्या पुनरागमनाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.





