Shilpa Shirodkar Car Accident | अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा अपघात झाल्याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे. तिच्या गाडीला एका बसने धडक दिली. या अपघातानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करताच तातडीने मदत केल्याबद्दल शिल्पाने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. शिल्पा शिरोडकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली, “आज सिटीफ्लोची एक बस माझ्या गाडीला धडकली आणि त्यांच्या मुंबईतील ऑफिसचे प्रतिनिधी योगेश कदम आणि विलास मांकोटे सांगत आहेत की ही त्यांच्या कंपनीची जबाबदारी नाही, ती चालकाची जबाबदारी आहे. किती निर्दयी लोक आहेत हे…. चालकाला असा किती पगार असेल?” सोबत शिल्पा शिरोडकरने इंस्टाग्राम स्टोरीजवर सिटीफ्लो बसने धडक दिल्यानंतर नुकसान झालेल्या तिच्या कारचे फोटो शेअर केले. Shilpa Shirodkar Car Accident | शिल्पाने मानले मुंबई पोलिसांचे आभार शिल्पाने मुंबई पोलिसांचे आभार मानत पुढे म्हटलं की, “धन्यवाद मुंबई पोलिस. तुम्ही मला यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात सहाय्य केलं. पण, त्या कंपनीने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. सिटीफ्लो, तुम्ही जर या प्रकरणासंदर्भात माझ्याशी संपर्क साधला तर त्याचं मी कौतुक करेन. सुदैवानं माझ्या स्टाफमधील कोणालाही दुखापत झाली नाही, पण काहीही होऊ शकलं असतं.” घडलेल्या प्रकरणात अभिनेत्रीला दुखापत झाली नसून ती सुखरुप आहे. मात्र शिल्पाने शेअर केलेल्या फोटोंमधून तिच्या गाडीचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. Shilpa Shirodkar Car Accident | शिल्पा शिरोडकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच बहुप्रतीक्षित थ्रिलर चित्रपट ‘जटाधरा’मधून झळकणार आहे. ‘जटाधारा’ हा चित्रपट रहस्यमय अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या दडलेल्या गूढ परंपरेभोवती फिरतो. याशिवाय तिने आदि शंकराचार्य यांच्या जीवनावर आधारित ‘शंकरा-द रिव्होल्यूशनरी मॅन’ नावाचा नवीन सिनेमा देखील साइन केला असल्याचे म्हंटले जात आहे. अलीकडेच ती ‘बिग बॉस १८’मध्ये झळकली होती. हेही वाचा : Voter List : नालासोपारा मतदार यादीत घोळ; एकाच महिलेचे नाव सहा वेळा, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश