Shilpa Rao : प्रसिद्ध गायिकेचा परफॉर्मन्स रोखला; नेमकं काय घडलं?
Shilpa Rao : काही यूजर्सनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आयोजकांवर टीका केली

Shilpa Rao : गायिका शिल्पा रावने एका पेक्षा एक गाणी गात पार्श्वगायनाच्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईत ‘बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट’च्या १० व्या वर्धापनदिन सोहळ्यातील शिल्पा राव लाईव्ह परफॉर्मन्स करणार होती.
मात्र, २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात झालेल्या विलंबामुळे शिल्पा रावचा कार्यक्रम अर्धवट थांबवण्यात आला. स्टेजवरील लाईट्स अचानक बंद करण्यात आले आणि गायिकेचा माइकही बंद करण्यात आला. चाहते तिला ऐकण्यासाठी उत्सुक होते आणि तिच्या नावाचा जयघोष करत होते.
मात्र, आयोजकांनी माइक पुन्हा चालू केला नाही. अखेर, गायिकेला तिचा परफॉर्मन्स थांबवावा लागला. या घडल्या प्रकारामुळे शिल्पा प्रचंड दु:खी झाली. त्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
शिल्पा रावची पोस्ट –
शिल्पा रावने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आज मुंबईत माझं हृदय तुटलं. तुमच्याकडून इतकं सुंदर व्यासपीठ असं हिरावून घेतलं जाणं, हे खूप हृदयद्रावक आहे. पण जेव्हा संगीत थांबलं, तेव्हाही तुम्ही सगळे थांबला नाहीत. तुम्ही माझं नाव घेत राहिलात आणि तुमच्या आवाजातलं प्रेम मला जाणवलं.”
तिने पुढे लिहिले की, “काल रात्रीची आपली कहाणी अपूर्ण राहिली. पण मी वचन देते की मी परत येईन. माझं मुंबईवर खूप प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील.”, असं म्हणत शिल्पा रावने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे काही यूजर्सनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आयोजकांवर टीका केली.
हेही वाचा:
Rukmini Vasanth : ‘कांतारा’ फेम अभिनेत्रीचा आगामी चित्रपट; ‘थारा’च्या भूमिकेत दिसणार, पाहा पहिली झलक





