Rukmini Vasanth : ‘कांतारा’ फेम अभिनेत्रीचा आगामी चित्रपट; ‘थारा’च्या भूमिकेत दिसणार, पाहा पहिली झलक
Rukmini Vasanth : या चित्रपटात तिच्यासोबत देव रामनाथ आणि विनायक वैथियानाथन हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

Rukmini Vasanth : ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटातील अभिनयामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रुक्मिणी वसंत लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक श्री कार्तिक यांच्या आगामी चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार असून, तिच्या पात्राचे नाव ‘थारा’ असे आहे.
या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी रुक्मिणी वसंतच्या सहभागाची घोषणा केली. या चित्रपटात तिच्यासोबत देव रामनाथ आणि विनायक वैथियानाथन हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
श्री कार्तिक यांनी व्यक्त केला आनंद
दिग्दर्शक श्री कार्तिक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत रुक्मिणी वसंतचे स्वागत केले. तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ओका ओका जीवितम’ या चित्रपटाप्रमाणेच आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
View this post on Instagram
‘थारा’ची पहिली झलक
निर्मात्यांनी चित्रपटाच्या घोषणेसोबत एक खास व्हिडिओही प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक श्री कार्तिक, देव रामनाथ आणि विनायक वैथियानाथन हे ‘थारा’च्या भूमिकेसाठी योग्य कलाकाराची निवड करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. याचदरम्यान अचानक एक नोटिफिकेशन येते आणि तिघेही आश्चर्यचकित होतात. त्यानंतर रुक्मिणी वसंतची एंन्ट्री होते. या व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या ‘थारा’ या पात्राची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.
‘कानम’नंतर श्री कार्तिक यांचा नवा चित्रपट
दिग्दर्शक श्री कार्तिक यांना ‘कानम’ या चित्रपटातून विशेष ओळख मिळाली होती. टाइम ट्रॅव्हलची संकल्पना आणि आई-मुलाच्या नात्यातील भावनिक गुंफण यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता श्री कार्तिक एका नव्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. रुक्मिणी वसंतची मुख्य भूमिका आणि नव्या कलाकारांची साथ यामुळे या आगामी चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.





