Aryan Khan : शाहरुखचा लेक पुन्हा मैदानात.! ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’नंतर आर्यन खानची मोठी तयारी; काय करतोय पाहा….
त्याची भूमिका केवळ दिग्दर्शनापुरती मर्यादित न राहता कथानिर्मितीपर्यंत विस्तारू शकते. मात्र, या सीरिजचे नाव, कथानक आणि कलाकार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

Aryan Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. अभिनयाऐवजी दिग्दर्शन आणि कथाकथनाची वाट निवडणाऱ्या आर्यनने ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता त्याने आपल्या पुढील प्रोजेक्ट्ससाठी नवी रणनीती आखल्याचे वृत्त समोर आले आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊससाठी तो नव्या लेखकांचा शोध घेत असून, आगामी स्ट्रीमिंग सीरिजच्या लेखनात स्वतःही सक्रिय सहभाग घेण्याची त्याची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शाहरुखच्या लेकाचा पुढचा सर्जनशील डाव नेमका काय असणार, याबाबत मनोरंजनविश्वात उत्सुकता निर्माण झाली आहे.
रेड चिलीजसाठी नव्या लेखकांची टीम उभारण्याची तयारी
‘व्हरायटी इंडिया’च्या वृत्तानुसार, आर्यन खान आगामी चित्रपट आणि वेब सीरिजसाठी उदयोन्मुख लेखकांना जोडण्याच्या तयारीत आहे. नव्या कल्पना, वेगळे दृष्टिकोन आणि आजच्या काळाशी सुसंगत कथांना प्राधान्य देत लेखकांचा समूह तयार करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
आर्यन सध्या विविध स्क्रिप्ट्स वाचत असून, क्रिएटिव्ह डायरेक्टर्सच्या टीमसोबत नव्या कथांचा शोध घेत असल्याची माहिती आहे. आजच्या तरुणांचे आयुष्य, त्यांची नाती, बदलती विचारसरणी आणि आधुनिक जीवनातील गुंतागुंत या विषयांवर आधारित कथांचा विचार केला जात आहे. या प्रक्रियेतून भविष्यातील स्ट्रीमिंग प्रोजेक्ट्ससाठी नव्या लेखकांना संधी मिळू शकते.
विशेष म्हणजे, आगामी सीरिजच्या लेखनप्रक्रियेत आर्यन स्वतःही योगदान देण्यास उत्सुक असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्याची भूमिका केवळ दिग्दर्शनापुरती मर्यादित न राहता कथानिर्मितीपर्यंत विस्तारू शकते. मात्र, या सीरिजचे नाव, कथानक आणि कलाकार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधून दिग्दर्शनात पदार्पण
आर्यन खानने सप्टेंबर २०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमधून क्रिएटर आणि दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. गौरी खान यांच्या निर्मितीत रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या या सीरिजमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील झगमगाटामागचे राजकारण, स्पर्धा, संघर्ष आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंत यांवर व्यंगात्मक पद्धतीने भाष्य करण्यात आले होते.







