Crime News: सोशल मीडियावर टाकलेला फोटो डिलीट करावा लागल्याचा राग; अल्पवयीन विद्यार्थ्याकडून वर्गातील मुलीवर चाकू हल्ला
Crime News: विद्यार्थ्याला शाळेतून काढले

पिंपरी – शाळेच्या सहलीमध्ये विद्यार्थिनींचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान एका अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गातील विद्यार्थीनीवर चाकू हल्ला करण्यात झाले.
पाच दिवसांपूर्वी झालेल्या या वादातून व्हिडिओ डिलीट करावा लागल्याने आलेल्या रागातून विद्यार्थ्याने शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास महाळुंगे गावातील विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल सुटल्यानंतर प्रवेशद्वारावरच विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून बाणेर येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
शाळेमधील नववीच्या विद्यार्थ्यांची १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी, महाबळेश्वर येथे सहल गेली होती. या ठिकाणी कार्यक्रमात मुली डान्स करत असतानाचा व्हिडिओ त्यांच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलाने त्याच्या इंस्टाग्रामवर टाकला. या कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यामुळे त्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला होता. इंस्टाग्राम वर टाकलेला व्हिडिओ डिलीट करावा लागल्याचा राग विद्यार्थ्यांच्या मनात होता. मुलगा आणि मुलगी दोन्ही नववीचे विद्यार्थी आहेत.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत आले होते. दुपारी दोनच्या सुमारास शाळा सुटली. मुलगी शाळेच्या गेटवर असतानाच सव्वा दोनच्या सुमारास विद्यार्थ्यांने मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. तिच्या छातीवर आणि डाव्या डोळ्याजवळ त्याने चाकूने वार केले. यात मुलगी गंभीर जखमी झाली. अल्पवयीन मुलाला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विद्यार्थ्याला शाळेतून काढले
या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे की, शाळेच्या परिसरात घडलेल्या घटनेमुळे आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. सध्या आमचे संपूर्ण लक्ष संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केंद्रित आहे. जखमी विद्यार्थिनीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत शाळा पूर्ण सहकार्य करत आहे.
तसेच, विद्यार्थ्यांना आवश्यक भावनिक आधार देण्यासाठी शाळेतील समुपदेशक कार्यरत आहेत. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याविरुद्ध शाळेच्या शिस्तविषयक नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्याला शाळेतून निष्कासित करण्यात आले आहे. याशिवाय, शाळेच्या परिसरातील सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
‘आरोपी मुलगा आणि जखमी मुलगी एकाच शाळेत शिकत आहेत. दोघेही नववीत असले तरी त्यांचे बोर्ड वेगळे आहेत. दोघेही एकमेकांना ओळखत नाही. मात्र सहलीमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यांच्यात वाद झाला त्यातूनही घटना घडली आहे. मुलाला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.’ – अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बावधन.





