Five ancient Ganesh temples : कुठे तीन डोळ्यांचा गणपती, तर कुठे विहिरीत स्वयंभू मूर्ती; जाणून घ्या महाराष्ट्राबाहेरील ५ प्राचीन गणेश मंदिरांची महती
Five ancient Ganesh temples : भारतात गणपती बप्पांची अनेक प्राचीन मंदिर असून त्यापैकी पाच मंदिरांविषयी जाणून घेऊयात...

उद्यापासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. राज्यासह देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. महाराष्ट्रात गणेशाची अनेक प्राचीन मंदिर असून राज्याबाहेरही गणपती बप्पा त्यांच्या वेगळ्या रुपात विराजमान आहेत. भारतात गणपती बप्पांची अनेक प्राचीन मंदिर असून त्यापैकी पाच मंदिरांविषयी जाणून घेऊयात…
१ रणथंभौर त्रिनेत्र गणेश मंदिर (सवाई माधोपूर, राजस्थान)
रणथंभौर त्रिनेत्र गणेश मंदिर हे राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रणथंभौर किल्ल्यामध्ये स्थित भगवान गणेशाचे एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे देशातील अशा काही मोजक्या मंदिरांपैकी एक आहे जिथे भगवान गणेशाची त्रिनेत्र (तीन डोळे असलेल्या) रूपात स्थापना केली आहे. येथे भगवान गणेशाची त्यांच्या पत्नी रिद्धी-सिद्धी आणि पुत्र शुभ-लाभ यांच्यासह संपूर्ण कुटुंबासह स्थापना केली आहे.
इतिहासानुसार, हे त्रिनेत्र गणेश मंदिर १३ व्या शतकात चौहान घराण्याचे राजे हम्मीरदेव यांनी बांधले होते. असे मानले जाते की कोणत्याही शुभ प्रसंगापूर्वी किंवा लग्नापूर्वी पहिले आमंत्रण पत्रक येथे पाठवले जाते. हे सवाई माधोपूर रेल्वे स्टेशनपासून अंदाजे १३-१४ किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत टॅक्सी किंवा स्थानिक वाहनाने पोहोचता येते, त्यानंतर मंदिरात पोहोचण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात.
२ कनिपकम विनायक मंदिर (चित्तूर, आंध्र प्रदेश)
कनिपकम विनायक मंदिर याला श्री वरसिद्धी विनायक स्वामी मंदिर असे म्हटले जाते. हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले भगवान गणेशाचे एक प्रसिद्ध स्वयंभू मंदिर आहे. चित्तूरपासून सुमारे ११ किलोमीटर आणि तिरुपतीपासून ६८ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.
भगवान गणेशाची मूर्ती एका विहिरीच्या पाण्यात आहे आणि तिचा पाया आजपर्यंत सापडलेला नाही. या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून कनिपकम येथील हे विनायक मंदिर ११ व्या शतकात चोळ राजा कुलोथुंग चोळ प्रथम याने बांधले आणि १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात त्याचा विस्तार करण्यात आला.
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, तीन शारीरिकदृष्ट्या अपंग भावांना (आंधळे, बहिरे आणि मुके) विहीर खोदताना ही मूर्ती सापडली आणि तिच्या स्पर्शाने त्यांचे आजार बरे झाले.
३ पिल्लयारपट्टी कर्पगा विनायक मंदिर (शिवगंगा जिल्हा, तामिळनाडू)
तमिळनाडू राज्यातील शिवगंगा जिल्ह्यातील एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध रॉक-कट गुफा मंदिर आहे. इतर ठिकाणच्या गणपतीच्या मूर्तींना चार हात असतात, परंतु या मंदिरात श्री गणेशाची मूर्ती दोन हातांची आहे. गणपतीची सोंड ही उजव्या बाजूला वळलेली आहे, ज्याला ‘वाळंपुरी’ किंवा ‘दक्षिणवर्ती’ असे म्हणतात. ६ फूट उंच आणि ५ फूट रुंद अशी ही भव्य मूर्ती एकाच विशाल खडकातून कोरलेली आहे. बाप्पा येथे अर्धपद्मासनात विराजमान आहेत आणि त्यांच्या उजव्या हातात मोदक नसून एक शिवलिंग आहे, जे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी ते ध्यान करत असल्याचे दर्शवते.
या मंदिराचा इतिहास २५०० वर्षांहून अधिक जुना मानला जातो. येथील काही शिलालेख इ.स. पूर्व ५०० ते इ.स. १२८४ या काळातील आहेत. तमिळ भाषेत गणपतीला ‘पिल्लयार’ म्हटले जाते आणि याववरूनच या गावाचे नाव ‘पिल्लयारपट्टी’ पडले आहे. हे मूळतः एक शिव मंदिर असून येथे भगवान शिवाला समर्पित मंदीर आणि इतर शिल्पे देखील आहेत, जी ७ व्या शतकातील किंवा त्याहून जुनी आहेत. १२८४ पासून हे मंदिर नगरथार (नाट्यकोट्टई चेतियार) समुदायाद्वारे चालवले जाते.
४ मोती डुंगरी गणेश मंदिर (जयपूर, राजस्थान)
राजस्थान राज्यातील जयपूरमधील मोती डुंगरी गणेश मंदिर हे शहराच्या मध्यभागी असलेल्या मोती डुंगरी टेकडीवर वसलेले एक अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन हिंदू मंदिर आहे. मोती डुंगरी गणेश मंदिराच्या इतिहासानुसार, हे मंदिर १७६१ मध्ये सेठ जयराम पालीवाल यांनी बांधले होते. येथे स्थापित केलेली गणपतीची मूर्ती अंदाजे ५०० वर्षे जुनी आहे.
असे मानले जाते की ही मूर्ती उदयपूरहून आणली गेली होती आणि ज्या ठिकाणी ती घेऊन जाणारी बैलगाडी थांबली, त्या ठिकाणी हे मंदिर बांधले गेले.
या गणपतीच्या मूर्तीची सोंड उजवीकडे वाकलेली असून तिचा रंग शेंदरी आहे. कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य करण्यापूर्वी येथे प्रथम गणपतीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
५ मधुर महागणपती मंदिर (कासारगोड, केरळ)
मधुर महागणपती मंदिर ज्याला मधुर मंदिर किंवा मधुर श्री मदनंतेश्वर सिद्धिविनायक मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर केरळमधील कासारगोड शहरापासून सुमारे ७ ते ८ किलोमीटर अंतरावर आहे.
मधुवाहिनी (मोगरल) नदीच्या काठावर स्थित एक प्रसिद्ध आणि प्राचीन धार्मिक स्थळ आहे. जरी हे मंदिर मूळचे भगवान शिवाला (मदनंतेश्वर) समर्पित असले, तरी येथील मुख्य गर्भगृहात दक्षिणेकडे तोंड करून असलेल्या भगवान गणपतीच्या (महागणपती) मूर्तीला विशेष महत्त्व दिले जाते.
गाभाऱ्याच्या दक्षिण भिंतीवर एका मुलाने खेळताना गणपतीचे चित्र काढले होते. काळाशी सुसंगत हे चित्र आकाराने मोठे आणि जाड होत गेले, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे येथील गणपतीला प्रेमाने “बोड्डाजा” किंवा “बोड्डा गणेश” म्हटले जाते. मंदिराची रचना केरळ आणि द्रविड शैलीचे सुंदर मिश्रण असून, येथील छतावर रामायणातील प्रसंगांचे लाकडी कोरीवकाम केलेले आहे.
असे मानले जाते की, जेव्हा टिपू सुलतानने या प्रदेशावर आक्रमण केले तेव्हा त्याने हे मंदिर पाडण्याचा विचार केला. परंतु मंदिराच्या विहिरीचे पाणी प्याल्यानंतर त्याचा इरादा बदलला. त्याने मंदिर सुरक्षित ठेवले आणि केवळ आपल्या सैनिकांचे समाधान करण्यासाठी तलवार किंवा कट्यारीने भिंतीवर एक वार केला, ज्याच्या खुणा आजही तिथे पाहायला मिळतात.
येथे महागणपतीला अर्पण केला जाणारा “अप्पा” हा प्रसाद खूप प्रसिद्ध आहे. गणपतीची मूर्ती अप्पने झाकली जाते अशी “मूडप्पा सेवा” ही येथील एक मोठी आणि विशेष पूजा आहे. गणेश चतुर्थी आणि ५ दिवस चालणारा ‘मधुर बेदी’ हा वार्षिक उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Heavy vehicles: गणेशोत्सवात शहरात जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; वाहतूक पोलिसांचे कडक निर्बंध जारी










