Shikrapur Crime | कामगाराला डांबून मारहाण करत मागितली खंडणी

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथे कामगाराने कामाचे पैसे मागितल्याने त्या कामगाराला मारहाण करत हॉटेलमध्ये डांबून ठेवून मोबाइल काढून घेऊन त्याच्याकडे सत्तावन हजारांची खंडणी मागितल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसात अश्रू उर्फ अशोक बाळासाहेब खामकर (वय ३१, रा. जेकटेवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव), अनिकेत गोरख रोकडे, विशाल राजेंद्र (वय २५, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) घोगरे व दिलीप सुभाष आहिरे (वय २६, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. तळवाडे ता. सटाणा) या चौघांवर खंडणी व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील किरण कटारनवरे हा कामाला असलेल्या कंपनीचा पगार करणाऱ्या अशोक खामकर यांच्याकडे कामाचा पगार मागितला असता अशोकसह त्याच्या साथीदारांनी किरणला दुचाकीहून जातेगाव खुर्द येथील हिंदवी हॉटेलमध्ये नेले. तेथे आम्ही तुझा पगार देणार नाही, तुझ्यामुळे आमचे दोन कामगार पळून गेले, असे म्हणून अशोक आणि त्याच्या साथीदारांनी किरणला हाताने तसेच स्टीलच्या पाईपने मारहाण केली.
दरम्यान चौघांनी किरणकडे सत्तावन हजार रुपयांची मागणी करत किरणचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेऊन त्याच्या वडिलांना फोन करून पैशांची मागणी केली. किरणचे हात बांधून ठेवत त्याला हॉटेलच्या खोलीत रात्रभर डांबून ठेवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा किरणला मारहाण करत पैशांची मागणी केली. त्यावेळी किरणने त्याच्या दाजींना फोन करून घडलेला प्रकार सांगितला असता त्यांनी पोलिसांच्या मदतीने किरणची हॉटेलमधून सुटला केली.
याबाबत किरण आनंदा कटारनवरे (वय १८, सध्या रा. शिक्रापूर, मूळ रा. सांगवी खुर्द ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस नाईक प्रतिक जगताप करत आहेत.





