प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून अकरा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिक्रापूर येथील चाकण चौक येथून ज्योती कवडे या जामखेड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. यावेळी त्यांनी त्यांचे अकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि अकरा हजार रुपये रोख रक्कम पर्समध्ये ठेवली होती. बस थांबल्यानंतर ज्योती कवडे बसमध्ये बसत असताना त्यांच्या पर्सला कोणीतरी हिसका मारल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी तातडीने खाली उतरून पर्सची तपासणी केली असता, त्यातील दागिने आणि रक्कम चोरी केल्याचे निदर्शनास आले. याबाबत ज्योती संदीप कवडे (वय ३३, सध्या रा. चाकण, मूळ रा. बीड) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे करत आहेत.