प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे कौटुंबिक वादातून विभक्त राहत असलेल्या पतीने पत्नीला एकत्र राहण्याची मागणी करत तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली असून, शिक्रापूर पोलिसात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सणसवाडी येथे राहणाऱ्या अनिता अशोक शिंदे आणि त्यांचे पती अशोक शिंदे यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाल्याने दोघे विभक्त राहत होते. अनिता शिंदे घरी असताना त्यांचे पती अशोक शिंदे तेथे आले. त्यांनी अनिता यांना “आपण दोघे सोबत राहू, तू मुलांना गावाहून घेऊन ये” असे म्हटले. त्यानंतर अशोक यांनी खिशातील धारदार हत्यार काढून अनिता यांच्या गळ्याला लावले.अनिती यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, अशोक यांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत “तुला आता जिवंत ठेवत नाही” असे म्हणून धारदार शस्त्राने त्यांच्या हातावर वार करत जखमी केले. याबाबत अनिता अशोक शिंदे (वय ३५, सध्या रा. सणसवाडी) यांनी फिर्याद दिली असून, शिक्रापूर पोलिसांनी अशोक सिद्धनाथ शिंदे (सध्या रा. सणसवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार राकेश मळेकर हे पुढील तपास करत आहेत.