Stray Dog Attack : काळजाचा थरकाप! ११ वर्षीय बालिकेवर ८ कुत्र्यांचा तुटून हल्ला; शरीराचे तोडले लचके
Stray Dog Attack : ग्रामपंचायतीचे दावे फोल? शेकडो कुत्र्यांच्या लसीकरणाच्या गप्पा सुरू असतानाच बालिकेच्या शरीराचे लचके तोडल्याने खळबळ.

Stray Dog Attack – पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा प्रश्न गंभीर बनलेला असताना शिक्रापूर येथे एका ११ वर्षीय शाळकरी बालिकेवर कुत्र्यांच्या टोळक्याने भीषण हल्ला केल्याची घटना घडली आहे. अंजली गोपाल राठोड असे या जखमी बालिकेचे नाव असून, ती पाबळ चौक परिसरातील रहिवासी आहे.
कुत्र्यांनी बालिकेचे शरीराचे लचके तोडल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. अंजली ही आपल्या लहान भावाला जिल्हा परिषद शाळेत सोडून घरी परतत असताना साई पर्ल सोसायटीसमोर ७ ते ८ भटक्या कुत्र्यांनी तिला वेढले आणि हल्ला चढवला.
यावेळी तिने आणि परिसरातील महिलांनी आरडाओरडा केल्यावर स्थानिक नागरिक सुभाष आदक यांनी भिंतीवरून उडी मारून कुत्र्यांना पळवून लावले आणि बालिकेची सुटका केली. आदक यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. बालिकेच्या अंगावर १० ते १२ ठिकाणी खोलवर जखमा झाल्या असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकारी काय म्हणतात?
शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात श्वानदंश झालेली बालिका सकाळी दाखल झाली होती. मात्र, तिच्या शरीरावर १०-१२ ठिकाणी झालेले दंश अतिशय गंभीर स्वरूपाचे होते. पुढील उपचार आणि आवश्यक लसीकरणासाठी तिला ससून रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास नरवडे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीची भूमिका
शिक्रापूर गावात शेकडो कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. पाबळ चौक परिसरातील घटनेची माहिती मिळताच मी घटनास्थळाची पाहणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत योग्य उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन सरपंच रमेश गडदे यांनी दिले.





