प्रभात वत्तसेवा शिक्रापूर – निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) एका अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करत युवतीचे फोटो व्हायरल करण्याची तसेच कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात किशोर नारायण गायकवाड (वय ३५, रा. शिक्रापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निमगाव म्हाळुंगी येथील युवतीची ओळख किशोरसोबत झाल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी कोरेगाव भीमा, मंचर, पुणे येथील वेगवेगळ्या हॉटेलवर घेऊन जात तसेच युवतीला त्याच्या घरी बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केले. लग्नाबाबत विचारणा करू लागली असता युवतीला तिचे वेगवेगळ्या हॉटेलवरील फोटो व्हायरल करण्याची तसेच युवतीच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी किशोर गायकवाड याने दिली. याबाबत बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर करत आहेत.