Satara Accident: नाकाबंदी सोडून पोलीस मदतीला धावले! कास रस्त्यावरील अपघातात नागरिकांनीही दाखवली माणुसकी
Satara Accident: यवतेश्वर ते बोगदा मार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटारसायकलस्वाराला सातारा तालुका पोलीस व स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मिळाले नवीन जीवन.

Satara Accident – यवतेश्वर ते बोगदा मार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटारसायकलस्वारासाठी सातारा तालुका पोलिसांनी दाखविलेली तत्परता जीवदानाची ठरली. डायल ११२ वर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसोबत स्थानिक नागरिकांनीही मदतीचा हात पुढे केल्याने जखमीला विलंब न करता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यवतेश्वर ते बोगदा मार्गावर मोटारसायकलस्वाराचा अपघात झाल्याची माहिती डायल ११२ वरुन सातारा तालुका पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून जखमीला वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, कास रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी सुरु होती.
याठिकाणी वाहतूक नियमनाची जबाबदारी सांभाळणारे हवालदार सचिन घोरपडे यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी विलंब न करता घटनास्थळ गाठले. तेथे मोटारसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत होता. अपघातानंतर जखमीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत आवश्यक होते. घोरपडे यांनी नागरिकांच्या मदतीने जखमीला तातडीने रुग्णवाहिकेत हलविले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले.
अपघाताच्या घटनांमध्ये सुरुवातीचे काही मिनिटे अत्यंत निर्णायक ठरतात. अशा परिस्थितीत पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि नागरिकांनी केलेले सहकार्य यामुळे जखमीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कायदा- सुव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडतानाच संकटात सापडलेल्या नागरिकाच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या सातारा तालुका पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.





