Sheikh Hasina : शेख हसिना जिंकल्या, मात्र लोकशाही बळकट होणार का? हिंदूंवर काय परिणाम होणार, वाचा सविस्तर….

Sheikh Hasina – बांगलादेश या शेजारी राष्ट्रात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान शेख हसिना यांच्या आवामी लीग पक्षाचा विजय झाला आहे. सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे हसिना यांचा विजय तसा निश्चितच होता.
मात्र येथे लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे बांगलादेशच्या या निवडणुकीत केवळ ४१.८ टक्के मतदान झाले आहे. मतदान संपायच्या एक तास अगोदरपर्यंत केवळ २७ टक्के मतदान झाले होते.
निवडणुकीत लोकांचा, राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा सहभाग कमी असल्यामुळे या निवडणुकीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जर शेख हसिना यांना त्यांच्या देशात लोकशाही बळकट करायची असेल तर त्यांना सगळ्यांना सोबत घेऊनच वाटचाल करावी लागेल. सगळ्यांना म्हणजे विरोधी पक्षांनाही सोबत घ्यावे लागेल.
हिंदूंवर काय होणार परिणाम?
पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशातही लोकशाहीचा मार्ग सोपा नाही. या देशातही अनेक वेळा मार्शला लॉ आणला गेला आहे. अर्थात २००८ मध्ये जेंव्हा हसिना सत्तेत आल्या तेंव्हा त्यांनी बांगलादेशच्या घटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप सगळ्यांच्या समोर ठेवले होते. बांगलादेशात स्वत:ला असुरक्षित मानणाऱ्या हिंदूंनाही हसिना यांच्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
हिंदूंवर त्या देशात होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पूर्णत: संपुष्टात आलेल्या नाहीत. मात्र प्रमाण घटले आहे आणि सरकारमधील महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधीही काही हिंदूंना मिळाली. आर्थिक आघाडीवर बांगलादेशने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जगातील अल्पविकसित देशांच्या यादीतून आता हा देश २०२६ पर्यंत बाहेर येऊ शकणार आहे.
भारतासोबतचे संबंध
शेख हसिना यांच्या कारकीर्दीत भारत आणि बांगलादेश यांचे संबंध चांगले आहेत. भारतविरोधी घटकांशी शून्य सहिष्णुता असे धोरण हसिना यांनी स्विकारले आहे. जमीनी आणि सागरी सीमांविषयक दोन्ही देशांमधील वाद हसिना यांच्या कार्यकाळात संपुष्टात आणण्यात आले आहेत. कनेक्टीव्हिटीत सुधारणा झाली आहे परस्पर संवाद वृध्दींगत झाला आहे.
बांगलादेशची अंतर्गत स्थिती
उदारमतवादाच्या विरोधातील शक्तींविरूध्द शेख हसिना यांनी कायमच कठोर भूमिका घेतलेली दिसते. त्यांच्या या नीतीवर जोरदार टीकाही केली जाते. मात्र त्याचमुळे बांगलादेशातील विरोधी पक्षांमध्ये एकप्रकारचे रितेपण आले आहे. एकीकडे सरकारचे कट्टर विरोधक असलेले बांगलदेश नॅशनलीस्ट पार्टी अर्थात बीएनपी आणि जमातचे नेते ग्राउंड लेव्हलला आवामी लीगशी जोडले गेलेलेही दिसून येतात.
आता झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षानंतर ६२ अपक्ष निवडून आले आहेत व तोच एक मोठा गट तयार झाला आहे. यातलेही बहुतांश हे आवामी लीग पक्षाचेच डमी उमेदवार आहेत. आवामी लीगच्या उमेदवारांना ज्या प्रकारे लाख-दीड लाख मतांनी विजय मिळाला आहे त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.
धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन
क्रिकेटपटू शाकीब अल हसन मगुरा मतदार संघातून दीड लाख मतांनी विजयी झाला आहे. बांगलादेशात केवळ सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार विजयी होऊ शकतो अशी धारणा त्यामुळे देशात आणि जगात तयार झाली आहे. जर आणखी काही अन्य लोकांची अथवा नेत्यांची आवामी लीग पक्षात भरती झाली तर आवामी लीग या पक्षाचा पूर्वीचा धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन तसाच कायम राहणार नाही अशी भीतीही व्यक्त होताना दिसते. तसे झाले तर आवामी लीगचे पुढच्या पीढीतील नेते चीनच्या बाजूने झुकण्याची शक्यता अधिक असेल आणि
ही भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते
बांगलादेश एकपक्षीय राजवटीच्या दिशेने पुढे जाताना दिसतो आहे. हे त्या देशाच्या भविष्यातील आर्थिक विकासाच्या दृष्टीने शुभ संकेत नाहीत. लोकशाहीच्या जिवंपणासाठी एका मजबूत विरोधी पक्षाची बांगलादेशला आवश्यकता आहे. स्वत: पंतप्रधान हसिना यांच्या दृष्टीनेही ते अत्यावश्यक आहे. त्यांचा पक्ष पुढे नेणारेही त्यांच्याप्रमाणेच प्रभावशाली आणि लोकशाही मानणारे असणे आवश्यक आहे.





