Sheikh Hasina: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात दाखल

Bangladesh Violence | Sheikh Hasina: बांग्लादेशमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला आहे. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. बांग्लादेशमध्ये सत्तापालटाचे वारे वाहू लागले असून पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
त्या राजधानी ढाका सोडून भारताच्या दिशेने रवाना झाल्या असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर भारतातील त्रिपुरा येथील आगरतळा विमातळावर लँड झाले आहे. अशा स्थितीत भारत आपल्या मित्र राष्ट्राच्या विश्वासू नेत्याला आश्रय देणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होत आहे.
Bangladesh Prime Minister Sheikh Hasina departed from Bangabhaban at around 2:30pm on Monday on a military helicopter, accompanied by her younger sister, Sheikh Rehana for a “safer place.”: Bangladesh media reports pic.twitter.com/cAzcRgwvul
— ANI (@ANI) August 5, 2024
भारताने नागरिकांना काय सल्ला दिला आहे?
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “चालू घडामोडी लक्षात घेता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या बांगलादेशमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हालचाल मर्यादित ठेवण्याचा आणि आपत्कालीन फोन नंबरद्वारे ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जातो.”
आपत्कालीन क्रमांक देखील जारी
मंत्रालयाने आपत्कालीन क्रमांक देखील जारी केले आहेत, जे 8801958383679, 8801958383680, 8801937400591 आहेत. शेजारील देशात उपस्थित असलेल्या कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तो दिलेल्या क्रमांकांवर कॉल करून भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधू शकतो. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय विद्यार्थीही आठवड्याभरापूर्वीच बांगलादेशातून देशात परतले आहेत.
अस्थिरतेचे नेमके कारण काय?
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये अराजकता माजली आहे. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे.
बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये ३० टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना ५ टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते. मात्र आरक्षणाचा मुद्दा तापल्याने देशातील संपूर्ण वातावरण बिघडलं आणि हिंसाचार, जाळपोळीच्या घटनांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांना देश सोडण्याची वेळ आली.





