पुण्यातील कोट्यवधींच्या फ्लॅटशी शशिकांत चव्हाणांचा संबंध? सुषमा अंधारेंनी सगळचं काढलं, म्हणाल्या “त्यांनी अनेकांना त्रास…”

Sushma Andhare : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात वैष्णवीचा सासरा आणि दीर यांना यांना थार गाडी देण्याचा आरोप चोंधे बंधूंवर करण्यात आला आहे. यानंतर चोंधे बंधूंचे कारनामे समोर आले.
संकेत चोंधे यांच्या पत्नी धनश्री चोंधे यांनी पती आणि दीराविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात छळाची तक्रार दाखल केली होती. मात्र, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप धनश्री यांनी केला होता. आता या प्रकरणात उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधाळे यांनी शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कारवाई टाळण्यासाठी
शशिकांत चव्हाण यांची सख्खी बहीण ही जालिंदर सुपेकर यांची पत्नी आहे. शशिकांत चव्हाण यांच्यावरही कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. चव्हाण सध्या जामिनावर बाहेर असून, त्यांना पदोन्नती मिळाल्याचेही अंधारे यांनी सांगितले. चव्हाण यांनी अनेकांना त्रास दिला असून, मोक्का कारवाई टाळण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला आहे. या विषयी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले.
अंधारे यांनी चव्हाण यांच्या उत्पन्नाचा स्रोत आणि त्यांनी जमवलेली प्रचंड मालमत्ता यांचा तपास व्हावा, अशी मागणी गृहमंत्र्यांना केली आहे. तसेच वैष्णवी हगवणे प्रकरणाशी चव्हाण यांच्यावरील सीडीआर (CDR) आरोपांचा संबंध आहे का, याचीही चौकशी व्हावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. रावेतमधील ‘एलिगन्स’ नावाच्या स्कीममध्ये कोट्यवधींचे फ्लॅट असल्याची माहितीही समोर आली आहे. अनेक तालुक्यात शशिकांत चव्हाण यांच्या मालमत्ता आहेत, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.





