Shashi Tharoor : ट्रम्पच्या टॅरिफला भारताने कडक उत्तर द्यावे; शशी थरूर यांचे आवाहन

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर आपले टॅरिफ लादून भारताने प्रत्युत्तर द्यावे. भारत भविष्यातही रशियाकडून तेल खरेदी करत राहील. त्यासाठी सरकारने कोणत्याहे दबावाला भीक घालण्याची गरज नाही. जर रशिया आपल्याला स्वस्त तेल देत असेल, तर आपण रशियाकडून कच्चे तेल आयात करत राहिले पाहिजे. मला एक कळत नाही, या एका मुद्यावरुन ट्र्म्प विसंगत विधाने का करत आहेत, असे प्रतिपादन काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याच्या घोषणेला थरूर यांनी योग्य उत्तर दिले आहे.
बुधवार, ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवण्यासाठी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादला. ट्रम्प यांनी याबाबतच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे आणि हा अतिरिक्त कर २१ दिवसांत लागू होईल. यासह, अमेरिकेत भारतीय उत्पादनांवर लादलेला कर आता ५० टक्क्यांपर्यंत वाढेल. ट्रम्पच्या या करयुद्धाला भारताने तीव्र प्रतिसाद दिला आहे आणि त्याला अन्याय्य आणि अवास्तव असे म्हटले आहे. शशी थरूर पुढे म्हणाले की, रशियाकडून किती तेल खरेदी करायचे हे सध्याच्या बाजार परिस्थितीनुसार ठरवले जाईल. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.
अर्थव्यवस्था मृत नाही
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्था मृत असल्याचे म्हटले होते. त्यावर थरूर म्हणाले होते की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत, तशी भारतीय अर्थव्यवस्था मृत नाही. भारत आणि रशिया दोघेही त्यांच्या बुडत्या अर्थव्यवस्थेबद्दल काय करत आहेत, याने त्यांना काही फरक पडत नाही. राहुल गांधी यांनी ट्रम्प यांच्या विधानावर म्हटले होते की त्यांनी जे म्हटले ते चुकीचे आहे. भारत युरोपियन युनियनशी चर्चा करत आहे. भारताने आधीच ब्रिटिश सरकारशी करार केला आहे. इतर देशांशीही चर्चा सुरू आहे. जर आपण अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धा करू शकत नसलो तर आपल्याला आपल्या बाजारपेठेत विविधता आणावी लागेल. पण पर्यायांची कमतरता नाही.





