गलवान संघर्षानंतर मोदी सरकारने सत्य लपवले; काँग्रेसचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली –चीनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात २०२० यावर्षी गलवानमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. तेव्हापासून प्रत्येक देशभक्त भारतीयाच्या मनात काही प्रश्न उत्पन्न होत आहेत. मात्र, प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी मोदी सरकारने सत्य दडवण्याचे, लक्ष विचलित करण्याचे धोरण अवलंबले आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसने सोडले.
चीन आणि लष्कराविषयी केलेल्या टिप्पणीवरून सर्वोच्च न्यायालयाने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना फटकारले. चीनने भारताची जमीन बळकावल्याचे तुम्हाला कसे माहीत झाले, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावरून भाजपने राहुल यांना लक्ष्य करताना त्यांचा उल्लेख चीनचे गुरू म्हणून केला. त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
गलवानमधील धुमश्चक्रीनंतर ४ दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केले. कुणीच आपल्या हद्दीत घुसखोरी केली नसल्याचे त्यांनी म्हटले. ती चीनला दिलेली क्लीन चिट नव्हती का? पूर्व लडाखचा सुमारे १ हजार चौरस किलोमीटर भाग चीनी नियंत्रणात आला असल्याचे व्यापक वृत्त वर्ष २०२० मध्येच देण्यात आले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.





