Shashank Singh : ‘त्याने मला कानाखाली लगावली पाहिजे होती…’, श्रेयस अय्यरद्दल शशांक सिंगचं असं का म्हणाला?

Shashank Singh Praises Shreyas Iyer’s Leadership : आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये पंजाब किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून ६ धावांनी हार पत्करावी लागली. कर्णधार श्रेयस अय्यरने नवख्या खेळाडूंच्या संघाला फायनलपर्यंत नेल्याने त्याचे कौतुक होत आहे. फायनलनंतर पंजाबचा फलंदाज शशांक सिंहने अय्यरची प्रशंसा केली. क्वालिफायर दोन सामन्यात पंजाबने मुंबईचा पराभव केला, तेव्हा या सामन्यांतर श्रेयस अय्यर त्याच्यावर चांगला संतापला होता. यावर बोलताना शशांक सिंग म्हणाला, तेव्हा श्रेयसने मला कानाखाली लगावली पाहिजे होती.
सध्याच्या विश्व क्रिकेटमध्ये श्रेयसपेक्षा उत्कृष्ट कर्णधार कोणी नाही –
शशांक सिंग म्हणाला, सध्याच्या टी-२० क्रिकेटमध्ये विश्वात श्रेयस अय्यरपेक्षा चांगला कर्णधार कोणीही नाही. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी ज्यांच्याशी बोललो आणि जे पाहिलं, त्यानुसार सध्याच्या विश्व क्रिकेटमध्ये श्रेयसपेक्षा उत्कृष्ट कर्णधार कोणी नाही. तो आम्हाला स्वातंत्र्य देतो आणि सर्वांशी समान वागतो. कोणीही म्हणणार नाही की श्रेयसचा दृष्टिकोन वेगळा आहे. ड्रेसिंग रूममधील तरुण खेळाडू त्याा शांत व्यक्ती मानतात.”
श्रेयस हा असा एकमेव कर्णधार –
शशांक सिंग पुढे म्हणाला, “श्रेयस हा असा एकमेव कर्णधार आहे, ज्यांनी आम्हाला सांगितलं की, खेळादरम्यान कोणाकडे काही सूचना असतील, तर ते येऊन सांगू शकतात. जर त्याला ती सूचना योग्य वाटली, तर तो ती स्वीकारेल. असं खूप दुर्मिळ आहे.” क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध रनआउट झाल्यानंतर पंजाब किंग्जचा खेळाडू शशांक सिंह याला कर्णधार श्रेयस अय्यरने चांगलंच झापलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.
शशांकने याबाबत सांगितलं, “मी त्या झापडण्यास पात्र होतो. श्रेयसने मला स्पष्ट सांगितलं की, तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. मी सहजपणे धावत होतो, जणू गार्डन किंवा बीचवर धावत आहे. त्या महत्त्वाच्या क्षणी मी चुकीचं धावलो. माझ्या वडिलांनी तर फायनलपर्यंत माझ्याशी बोलणं बंद केलं होतं! मात्र त्यानंतर श्रेयसने मला रात्री जेवणासाठी बाहेर नेलं आणि आम्ही सगळं मिटवलं.” पंजाब किंग्ज यंदा फायनलमध्ये हरला असला, तरी शशांकने ठामपणे सांगितलं, पुढच्या सीझनमध्ये आम्ही नक्कीच विजेते होऊ!”





