Mumbai Indians : अंपायरला शिवीगाळ करणं भोवलं! MI च्या ‘या’ दिग्गज खेळाडूवर BCCI कडून कारवाई
धरमशाळेच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पंजाब किंग्सचा ६ गडी राखून दणदणीत पराभव केला.

Mumbai Indians : धरमशाळेच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पंजाब किंग्सचा ६ गडी राखून दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सने २० षटकात २०० धावांचा डोंगर उभारला होता.
मात्र, मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लक्ष्याचा पाठलाग करताना दमदार कामगिरी केली आणि सामना ६ गडी राखून जिंकला. या विजयात मुंबईकडून तिलक वर्माने नाबाद ७५ धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. त्याला विल जॅक्सने २५ धावांची चांगली साथ दिली.
पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंगने ५७ धावांची सर्वोच्च खेळी केली. प्रियांश आर्यने २२ धावा केल्या, तर अझमतुल्लाह ओमरजाईने शेवटच्या टप्प्यात ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांच्या विजयात उपयुक्त ठरला.
सामना जिंकल्यानंतर मात्र मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एक नकारात्मक बातमी समोर आली. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, पोलार्डच्या मॅच फीवर १५ टक्के दंड आकारण्यात आला असून, त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.
पोलार्डने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल-१ चे उल्लंघन केल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, लाईव्ह सामन्यादरम्यान त्याने चौथ्या अंपायरला शिवीगाळ केली होती. पोलार्डने आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केल्याची कबुली दिली आहे. कायरन पोलार्ड हे मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. आयपीएल नियमांनुसार, खेळाडू, प्रशिक्षक किंवा कोणत्याही अधिकाऱ्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्वरित कारवाई केली जाते.






