Sharmila Thackeray: “जळून खाक झालेली पिके पाहून मन सुन्न होतंय…” दुष्काळाच्या भीषण वास्तव पाहून काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
Sharmila Thackeray: जेजुरी येथे नवीन वस्त्रदालनाच्या उद्घाटनाप्रसंगी शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती; दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करण्याची केली मागणी.

Sharmila Thackeray- महाराष्ट्रामध्ये यंदा दुष्काळाची भीषण दाहकता जाणवू लागली आहे. ग्रामीण भागातील दौऱ्यादरम्यान पाण्याअभावी जळून खाक होत असलेली पिके पाहताना मन सुन्न होते. आगामी काळात पशुधनासाठी चारा, पिण्याचे पाणी आणि जळालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे होणे गरजेचे आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या धोरणानुसार दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक तेथे आणि शक्य ती सर्व मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.
मुंबईत गेल्यानंतर हा संपूर्ण विषय राज ठाकरे यांच्यापुढे मांडणार आहे, असे आश्वासन शर्मिला राज ठाकरे यांनी जेजुरी येथे दिले. पुरंदर मनसे तालुकाप्रमुख उमेश जगताप व रवींद्र चिंबळकर यांनी महिलांसाठी नव्याने सुरू केलेल्या वस्त्रदालनाचे उद्घाटन मंगळवारी (दि. १३) शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सध्याच्या राजकीय व निवडणूक प्रक्रियेवर कडाडून टीका करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या,
सध्या प्रत्यक्ष काम करणारे वेगळे आणि निवडून येणारे भलतेच, असे चित्र पाहायला मिळत आहे. आपण रात्रंदिवस लोकांसाठी काम करतो; मात्र निवडणूक आयुक्तांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात. हा प्रकार आता लवकरात लवकर थांबला पाहिजे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मनसे राज्य सरचिटणीस रिटा गुप्ता, जानकी सरदेसाई, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. पोपटराव सूर्यवंशी, मकरंद पाटे,
चित्रपट निर्माते महेश पटेल, सिनेअभिनेते संतोष जुवेकर, जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे-पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यावसायिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष जयदीप बारभाई आणि अभिनेते संतोष जुवेकर यांनीही या वेळी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक उमेश जगताप यांनी तर माजी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन शिवराज झगडे यांनी केले .





