Nevase : माझ्यातील समाजकारणाचा पिंड रोटरीने जागृत केला; नेवासे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले
Nevase : या कार्यक्रमामध्ये नेवासे येथील समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान, बांधकाम मजुरांसाठीचे कार्य आणि जायकवाडी जलाशय परिसरातील शेतकरी व धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणारे नेवासे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

नेवासे : श्रीरामपूर येथील रोटरी क्लबचा नूतन पदाधिकारी पदग्रहण समारोह मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष उद्धव तांबोळी यांनी आपल्या पदाची सूत्रे नूतन अध्यक्ष सरबजीत सिंग चुग यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये नेवासे येथील समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान, बांधकाम मजुरांसाठीचे कार्य आणि जायकवाडी जलाशय परिसरातील शेतकरी व धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणारे नेवासे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर भागनाथ काटे, आमदार हेमंत ओगले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करणदादा ससाणे, डॉ.दिलीप पडघन, सचिन गुजर यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. करणसिंह घुले यांनी रोटरीशी असलेले आपले नाते उलगडले. ते म्हणाले, “समाजकारणात पदार्पण करताना मी रोटरी क्लब सोबतच पहिले पाऊल टाकले होते.आजही मी केलेल्या छोट्याशा कामाची दखल घेऊन रोटरीने माझा सन्मान केला. माझ्यातील सामाजिक कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्याची जाणीव आज या कार्यक्रमच्या माध्यमातून रोटरीने करून दिली असल्याचे गौरोदगार यावेळी त्यांनी काढले”
यावेळी पुढे बोलताना त्यांनी राजकारण आणि समाजकारणातील फरकावर रोखठोक भाष्य केले. “आज राजकारणात विनाकारण शिंतोडे उडवणाऱ्यांचा आणि सुमार बुद्धिमत्ता असलेल्या बोलघेवड्यांचा बोलबाला आहे. मात्र समाजकारणात एकमेकांना सहकार्याची भावना असते. यातून उभे राहिलेले काम हे आयुष्यभराचे समाधान देऊन जाते. म्हणूनच मी कायम समाजकारणी राहण्याचा प्रयत्न करतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना डॉ. घुले यांनी युवकांनी राजकारणाकडे न पाहता समाजकारणाकडे वळावे,असे मौलिक आवाहन केले.
कार्यक्रमात डॉ. करणसिंह घुले यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. नेत्रदान चळवळ आणि धरणग्रस्तांच्या प्रश्नावर त्यांनी केलेले काम हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत नगराध्यक्ष करणदादा ससाणे यांनी व्यक्त केले.





