Sharmila Thackeray : ‘मला अमितचा मोठा विजय हवाय…’ – शर्मिला ठाकरे

Sharmila Thackeray | Amit Thackeray । Maharashtra Assembly Voting 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता येईल. दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53% मतदान झाले असून, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 62.99%, तर मुंबई शहर विभागात सर्वात कमी 36.34% मतदान झाले आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कुटुंबासह मतदान केले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा (माहिम मतदार संघातील मनसेचे उमेदवार) अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे यांच्यासह दादरच्या शिवाजी पार्कमधील बालमोहन विद्यामंदिरात आपला मतदानाचा हक्क बजावला.
राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे माहिममधून निवडणूक रिंगणात आहे. अमित ठाकरेंसमोर तीन वेळचे आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचं आव्हान आहे. सदा सरवणकर यांची मतदारसंघावर पकड आहे. त्यांनी नगरसेवक ते आमदार असा प्रवास केला आहे. सदा सरवणकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत.
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यावेळी ‘मला अमितचा अभिमान आहे की तो स्वतः मैदानात उतरून या गोष्टी करतो आहे. तो निवडून येईल याची 100 टक्के खात्री आहे. मला अमितचा मोठा विजय हवाय छोटा विजय नकोय’. असा विश्वास बोलून दाखवला.
त्या म्हणाल्या की, “अमित पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. तो लढतो आहे. महिनाभर आम्ही प्रचारासाठी लोकांच्या घरोघरी जात होतो, आम्हाला अनेक प्रश्न समजले आहेत, ते सोडवायचे आहेत. अमित ठाकरे यांच्याविरोधातल्या उमेदवारांना आम्ही अर्ज मागे घ्या असेही म्हटले नाही. उलट ते शेवटच्या दिवशी भेटायला आले तर आम्ही ते ही टाळलं” असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.
“दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन आरशासमोर उभे राहून मागच्या निवडणुकीत वरळीत निवडणूक लढण्यात आली होती, तशी आम्ही निवडणूक लढवत नाहीय. मला अमितचा अभिमान आहे की तो स्वतः मैदानात उतरून या गोष्टी करतो आहे. तो निवडून येईल याची 100 टक्के खात्री आहे. मला अमितचा मोठा विजय हवाय छोटा विजय नकोय” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.





