Stock Market Rise: भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होऊन भारतातील बहुतांश वस्तूवर अमेरिका केवळ अठरा टक्के आयात शुल्क लावणार आहे. या घडामोडीचा भारतातील दागिने, वाहनाचे सुटे भाग, तयार कपडे, कातड्याच्या वस्तू, खेळणी इत्यादी क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होणार आहे. यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाढ नोंदली गेली. गोल्डीआम इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरचा भाव 20 टक्क्यांनी, वैभव ग्लोबल कंपनीच्या शेअरचा भाव 9.13 टक्क्यांनी, कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअरचा भाव 4.91 टक्क्यांनी, शृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र कंपनीच्या शेअरचा भाव 4.51 टक्क्यांनी वाढला. अमेरीकेत बरेच भारतीय नागरिक राहतात. त्यांना भारतीय बनावटीचे दागीनेे आवडतात. त्यामुळे या कंपन्यांची अमेरिकेला निर्यात वाढणार असल्यामुळे या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. दागिने उद्योगाला मोठ्या प्रमाणात फायदा – टायटन कंपनीच्या शेअरचा भाव 2.80 टक्क्यांनी, पी एन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीच्या शेअरचा भाव 1.52 टक्क्यांनी, पीसी ज्वेलर्स कंपनीच्या शेअरचा भाव 0.19 टक्क्यांनी वाढला. शेअर बाजाराचे निर्देशांक सकाळी साडेपाच टक्क्यांनी वाढले होते. त्यामुळे एकूणच शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. याचा फायदा दागिने उद्योगाला मोठ्या प्रमाणात झाला. भारतातील वाहनाचे सुटे भाग तयार करणार्या कंपन्यांची अमेरिकेला प्रचंड निर्यात होते. मात्र 50 टक्के आयात शुल्क लावल्यामुळे या कंपन्यांची कुचंबना झाली होती. भारतातील कंपन्यांचे प्रकल्प कॅनडा आणि मेक्सिकोत आहेत. या दोन्ही देशांनी भारतीय आयातीवर शुल्क लावल्यामुळे या उद्योगासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आता अमेरिकेला निर्यात होणार असल्यामुळे या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. बेलराईज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरचा भाव सात टक्क्यांनी, भारत फोर्ज कंपनीच्या शेअरचा भाव साडेसहा टक्क्यांनी, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल या कंपनीच्या शेअरचा भाव चार टक्क्यांनी, बॉश इंडिया या कंपनीच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी, युएनओ मिंडा कंपनीच्या शेअरचा भाव 2.86 टक्क्यांनी वाढला. Aluminum And Steel Tariffs: भारतीय वस्तूंवर आता 18% आयात शुल्क; ॲल्युमिनियम आणि स्टीलवर मात्र 50% टॅक्स कायम समुद्री खाद्य रसायन कंपन्या तेजीत – समुद्री खाद्य व रसायनिक क्षेत्रातील कंपन्यांत तेजीत होत्या. अवंती फीड्स कंपनीच्या शेअरचा भाव 20 टक्क्यांनी वाढून 960 रुपये या पातळीवर गेला. अपेक्स फ्रोजन फुड्स कंपनीच्या शेअरचा भाव 20 टक्क्यांनी वाढून 351 रुपये प्रति शेअर झाला आणि या शेअरला सर्किट लिमिट लावावे लागले. झील अॅक्वा कंपनीच्या शेअरचा भाव दहा टक्क्यांनी, किंग इन्फ्रा कंपनीच्या शेअरचा भाव सात टक्क्यांनी, मुखा प्रोटीन्स कंपनीच्या शेअरचा भाव पाच टक्क्यांनी, कोस्टल कार्पोरेशन कंपनीच्या शेअरचा भाव पाच टक्क्यांनी वाढला. रसायन क्षेत्रातील आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरचा भाव 15 टक्क्यांनी वाढला. गुंतवणूकदारांचा 12.10 लाख कोटीचा फायदा भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मंगळवारी अडीच टक्क्यांनी वाढले. या कारणामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य मंगळवारी एकाच दिवसात 12.10 लाख कोटी रुपयांनी वाढून 467 लाख कोटी रुपये म्हणजे 5.16 लाख कोटी डॉलरवर गेले आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या साधारणपणे चार लाख कोटी डॉलरची असल्याचे समजले जाते. आज झालेल्या खरेदीचा फायदा ब्लुचिप कंपन्याबरोबरच छोट्या कंपन्यांनाही झाला आणि मिडकॅप व स्मॉल मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे शेअर गुंतवणूकदारांचे भाग्य उजळले. विशेष म्हणजे कराराचा तपशील आल्यानंतर शेअर बाजारात आगामी काळातही सकारात्मक वातावरण कायम राहण्याची शक्यता बहुतांश विश्लेषकांनी व्यक्त केली. परदेशी गुंतवणूकदार परत येणार असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात 5% पर्यंत वाढ होऊ शकेल असे समजले जात आहे. India-US Trade Deal: शेतकरी आणि दुग्ध उत्पादकांच्या हिताशी तडजोड नाही; वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे स्पष्टीकरण