Share Market Fraud: शेअर मार्केटमध्ये ‘डबल पैशां’चं आमिष अन् कोट्यवधींचा गंडा; बारामतीतील बंधूंविरुद्ध गुन्हे दाखल
Share Market Fraud: 'बिग बुल इन्स्टिट्यूट'च्या नावाने शेअर मार्केटमध्ये निश्चित परताव्याचे आमिष; डोर्लेवाडीतील नाळे बंधूंवर बारामती शहर ठाण्यात २ गुन्हे दाखल.

Share Market Fraud – शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व गुंतवणुकीच्या माध्यमातून आकर्षक व निश्चित परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारून मूळ रक्कम व परतावा न दिल्याच्या आरोपावरून कार्तिक अरविंद नाळे व गौरव अरविंद नाळे (दोघे रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके कार्यरत केली आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्तिक व गौरव नाळे यांच्यासह BIG BULL INSTITUTE OF TRADING & FINANCE या नावाचा या प्रकरणात उल्लेख आहे. या प्रकरणात शेअर मार्केट ट्रेडिंग व गुंतवणुकीत निश्चित परताव्याचे आश्वासन देऊन रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे.
दरम्यान, रणजित बाळासो शिंदे यांच्या फिर्यादीवरून दि. ३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने आरोपींकडे रोख व बँक व्यवहाराद्वारे एकूण २२ लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सुरुवातीला काही परतावा मिळाल्यानंतर पुढे नियमित परतावा बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास व्यापक स्वरूपात सुरू असून,
आरोपींनी स्वीकारलेली रक्कम प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यात आली होती का, ती कोणत्या बँक खात्यांमधून पुढे वळविण्यात आली. संबंधित डीमॅट व ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणते व्यवहार झाले, यासह संपूर्ण मनी ट्रेलची सखोल पडताळणी करण्यात येत आहे. बँक खाते, UPI, NEFT, IMPS, RTGS व्यवहार, ब्रोकर स्टेटमेंट, डीमॅट होल्डिंग्ज तसेच मालमत्तेची माहितीही तपासण्यात येत आहे.





