Sharad Sonavane: “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर शाहिरीशिवाय पर्याय नाही;” आमदार शरद सोनवणे याचे प्रतिपादन
Sharad Sonavane: छत्रपती शिवराय कलगीतुरा भेदिक लावणी शाहिरी संघ व बेल्हे ग्रामस्थांचा उपक्रम; विसावा चौकातील सभागृहात रंगला शाहिरी कलेचा जल्लोष.

Sharad Sonavane- इतिहास केवळ पुस्तकांमध्ये जतन करून उपयोग नाही, तर तो पुढील पिढीपर्यंत जिवंत ठेवायचा असेल, तर शाहिरी कलेशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आमदार शरद सोनवणे यांनी केले. बेल्हे येथे छत्रपती शिवराय कलगीतुरा भेदिक लावणी शाहिरी संघ, महाराष्ट्र राज्य आणि बेल्हे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शाहिरी मेळाव्यात ते बोलत होते.
रविवारी बेल्हे येथील विसावा चौकातील कै. धोंडीभाऊशेठ सदाशिव पिंगट सामाजिक सभागृहात हा मेळावा उत्साहात पार पडला. या शाहिरी मेळाव्याच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांतून शाहीर बेल्हे येथे दाखल झाले होते. पारंपरिक शाहिरीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास, सामाजिक प्रबोधन आणि महाराष्ट्राची समृद्ध लोककला रसिकांसमोर सादर करण्यात आली. विविध शाहिरांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
आमदार सोनवणे पुढे म्हणाले की, शाहिरी ही केवळ करमणुकीची कला नसून समाजप्रबोधन आणि इतिहास जागविण्याचे प्रभावी माध्यम आहे. महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झालेल्या या कलेने छत्रपती शिवरायांचा पराक्रम, संतांचे विचार आणि सामाजिक चळवळींचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे शाहिरी कलेचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी नव्या पिढीने स्वीकारली पाहिजे.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके, उद्योजक सागर लामखडे, मोहन बांगर, इलियास बेपारी, शाहीर स्वप्निल गायकवाड, शिवाजी कवडे, तानाजी माळवदकर तसेच जुन्नर तालुक्यासह परिसरातील कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभरातून आलेल्या शाहिरांच्या उपस्थितीमुळे बेल्हे परिसरात दिवसभर शाहिरी कलेचा जागर पाहायला मिळाला. पारंपरिक कलगीतुरा, भेदिक लावणी आणि शाहिरीच्या सादरीकरणाने वातावरण रंगून गेले.
मेळाव्याच्या आयोजनासाठी छत्रपती शिवराय कलगीतुरा भेदिक लावणी शाहिरी संघ, महाराष्ट्र राज्य तसेच बेल्हे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोककलेला व्यासपीठ मिळाले असून, नव्या पिढीला महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेची ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून झाले.





