अजित पवारांशी वारंवार होणाऱ्या भेटीमुळे शरद पवारांची प्रतिमा मलिन होतेय…

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वारंवार होणाऱ्या बैठकांमुळे शरद पवारांची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून केला आहे. अजित पवार वारंवार शरद पवार यांना भेटत आहेत हे पाहणे “मनोरंजक” आहे आणि शरद पवार देखील या भेटी टाळत नाहीत.
अजित पवारांना ज्येष्ठ पवारांच्या भेटीसाठी पाठवून गोंधळ घालण्याचा भाजपचा ‘चाणक्य’ प्रयत्न असावा असे मतही यात करण्यात आले आहे. मात्र, अशा भेटींमुळे शरद पवारांचीच प्रतिमा मलिन होते आहे आणि ते चांगले नाही, असे त्यात म्हटले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील पुण्यातील गुप्त भेटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ही प्रतिक्रीया आली आहे.
अजित हा माझा पुतण्या आहे आणि मी पवार घराण्यातील वडिलधारी आहे त्यामुळे त्यांनी मला भेटणे यात वृत्तपत्रांनी दखल घ्यावी असे काहींही नाहीं असा खुलासा शरद पवारांनी केला आहे. पण राजकीय वर्तुळात त्या विषयी शंकाकुशंका निर्माण होऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाची ही प्रतिक्रीया त्याचाच एक भाग मानला जात आहे.
संपादकीयात म्हटले आहे की, गोंधळ निर्माण करण्याचा हा रोजचा खेळ आता लोकांच्या भावनांच्या पलीकडे गेला आहे. सध्याच्या राजकीय खेळामुळे जनता सुन्न झाली आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या सरकारमधील समावेशाने मुख्यमंत्र्यांची झोप उडाली आहे.
ते 24 तास काम करतात असे सांगिते जाते पण त्यानंतर ते लगेच 72 तास आराम करू लागले आहेत. मुख्यमंत्री वारंवार हेलिकॉप्टरने आपल्या मूळ गावी जाऊ लागले आहेत. त्यातच पुन्हा अजित पवार हे शरद पवारांना भेटू लागल्याने सर्वांच्याच लहान मेंदुला त्रास होऊ लागला आहे.
त्यामुळे साताऱ्यात जाऊन गावठी जडीबुटी आणि बुवाबाजीच्या उपचाराचा उपयोग होणार नाही असा टोमणाहीं यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लावण्यात आला आहे. अजित पवारांमुळे मुख्यमंत्र्यांच्या श्वसन नलिकेत अडथळे निर्माण झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांचा नेमका आजार काय याविषयी आरोग्य मंत्र्यांनी आता मेडिकल बुलेटिन जारी केले पाहिजे अशी उपरोधिक सुचनाहीं यात करण्यात आली आहे.





