Sharad Pawar । Badalapur: बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले. पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई अशा प्रमुख शहरांत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून हे आंदोलन केले करण्यात येत आहे. पुण्यात खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना एक शपथ घ्यायला लावली. या आंदोलनावेळी शरद पवारांनी तोंडावर काळ्या रंगाचा मास्क आणि दंडावर काळी पट्टी बांधत सहभाग नोंदवला. या आंदोलनानंतर शरद पवारांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना एक शपथ घ्यायला लावली. “मी अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवेन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखेन आणि या पुण्य नगरीतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेन”, अशी शपथ शरद पवारांनी यावेळी वाचून दाखवली. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही ही प्रतिज्ञा घेतली. उद्धव ठाकरे काय म्हणाले? “अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याही पेक्षा त्यांच्या पापावर पांघरूण घालणाऱ्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे. आज खरं तर महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली. त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी आपले चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि अडथळे निर्माण केले. गेल्या आठवड्यात भारत बंद काही राज्यात पुकारला. त्यावेळी रेल्वे बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते. बंदला विरोध करणारे याचिकाकर्तेही तितकेच विकृत आहेत. इथे काही सरकारचे ‘सदा’आवडते आहेत. त्यांच्या माध्यमातून हा बंद होवू नये यासाठी कोर्टात गेले. महिला जाब विचारत आहेत, आमच्या सुरक्षेच्या आड का येताय? पण हे आंदोलन थांबता कामा नये. बस डेपो, रिक्षा स्टँड, चौकात स्वाक्षरी मोहीम घ्या. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत. राखी बांधण्यात आडकाठी येऊ नये म्हणून आमच्या आंदोलनात आडकाठी करत आहात.इतकं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.