Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रुबी हॉलचे डॉ. अभिजित लोढा यांनी माहिती दिली आहे. पवार साहेब आयसीयूमध्ये नसून खासगी रूममध्ये आहेत.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना खोकला, घसा खवखवणे, ताप आणि श्वास घेण्यात काही अडचण येत होती.
आज सकाळपासून त्रास वाढल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानावरून कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह त्यांचा ताफा पुण्याकडे रवाना झाला. सध्या त्यांच्यावर रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीबाबाबत डॉक्टर अभिजित लोढा यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाले डॉ अभिजित लोढा?
डॉ लोढा म्हणाले, काही दिवसांपासून शरद पवार यांना हा त्रास जाणवत असावा. शारीरिक परिश्रम झाल्यामुळे त्यांना काहीसा थकवा जाणवत होता आणि खोकला देखील होता. शरद पवार सध्या एका खाजगी रुममध्ये आहेत, आय सी यू मध्ये नाहीत. काही चाचण्या आम्ही केल्या असून त्याचे अहवाल पुढील २ ते ३ तासांत येतील. कुठलीही काळजी करायची गरज नाही, असं डॉक्टरांनी सांगितले आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार साहेबांचे शारीरिक परिश्रम होत आहेत. कुठल्या ही कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊ नये, हॉस्पिटलचे सगळे प्रोटोकॉल पाळावेत. आपल्यामुळे इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कुठला ही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. ते आय सी यू मध्ये नाहीत एका खाजगी रुममध्ये आहेत. पुढील १ ते २ दिवसांसाठी त्यांना रुग्णालयात ऍडमिट केलं जाईल आणि त्यानंतर ते स्वतःच्या गाडीने मुंबईला जातील, प्रकृती उत्तम आहे, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.





