Sharad Pawar : सरकारचं टेन्शन वाढणार ! राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त (Sharad Pawar) मुंबईतील यशवंतराव चव्हाण (वाय. बी.) सेंटर येथे बुधवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त (Sharad Pawar) मुंबईतील यशवंतराव चव्हाण (वाय. बी.) सेंटर येथे बुधवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील शेतकरी संकट, उपेक्षित समाजाचे प्रश्न आणि देशाची बिघडत चाललेली परराष्ट्र नीती या मुद्द्यांवरून विद्यमान सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणात त्यांनी सध्याच्या शेतकऱ्यांच्या अत्यंत दयनीय परिस्थितीवर खोल चिंता व्यक्त केली.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, आज राज्यातील शेतकरी प्रचंड संकटात आणि कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांचा तीव्र तुटवडा जाणवत असून, खत मिळवण्यासाठी त्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रात्र-रात्र जागूनही शेतकऱ्यांना खत मिळत नाही आणि हताश होऊन शेतकऱ्यांना खताच्या दुकानाबाहेरच रस्त्यावर झोपावे लागत आहे.
नुकतीच काल एक यादी समोर आली आहे, ज्यामध्ये गेल्या अवघ्या आठ दिवसांत किती शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले, याची धक्कादायक माहिती आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या घामाची कोणतीही किंमत राहिलेली नाही, म्हणूनच आज राज्यातील शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करताना दिसत आहे.
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी सरकारला इशारा दिला की, आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने लक्ष द्यावेच लागेल. समाजासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा देश माझा आहे आणि येथे आपले हित जपले जाईल, असे वाटेल असा राज्यकारभार चालणे गरजेचे आहे.
परंतु, सध्याच्या शासनाकडून या अपेक्षेची पूर्तता होत नसल्यामुळेच आज शेतकऱ्यांच्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून उपेक्षित समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करतील.
जर आवश्यकता भासली तर राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी थेट रस्त्यावर उतरेल. ज्यांच्या हातात आज सत्ता आहे, त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम पक्ष करेल आणि तरीही सत्ताधाऱ्यांनी आपले म्हणणे स्वीकारले नाही, तर त्यांच्याविरोधात तीव्र संघर्ष केला जाईल, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.
देशांतर्गत प्रश्नांसोबतच त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रकाश टाकत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. जगात सध्या अनेक संकटे उभी ठाकली असून गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इतर देशांमध्ये युद्ध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये ज्या देशांवर अन्याय होतो, त्या देशांना नेहमी मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच भारताच्या परराष्ट्र नीतीचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे.
मात्र, आता इराणवर सातत्याने हल्ले होत असताना, भारताची जी पारंपरिक आणि खंबीर परराष्ट्र नीती होती, ती सध्याच्या सरकारकडून नीट सांभाळली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शेवटी, पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते (Sharad Pawar) म्हणाले की, आता आपल्याला शांत बसायचे नाही, तर तातडीने जनतेच्या कामाला लागायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कधीही स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका कार्यकर्त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने जनतेसमोर सिद्ध करून दाखवावी.






