विविधा: शंकर पाटील

माधव विद्वांस

महाराष्ट्राला पोट धरून हसविणारे, ग्रामीण जीवनाचा वेध घेणारे ज्येष्ठ पटकथा लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार, शंकर पाटील यांचे आज पुण्यस्मरण. त्यांच्या निधनाबाबत दोन ठिकाणी वेगवेगळ्या तारखा आहेत. त्यांचा जन्म हातकणंगले तालुक्‍यातील (जि. कोल्हापूर) पट्टण-कोडोली येथे 8 ऑगस्ट, 1926 रोजी झाला. त्यांचे शिक्षण तारदाळ (ता. हातकणंगले) व गडहिंग्लज येथे व कोल्हापूर येथे बी. ए. बी. टी. पर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन केले. त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियुक्‍ती झाली (1947).

1959 मध्ये एशिया फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून ग्रामजीवनाचा अभ्यास केला आणि त्यावर त्यांनी टारफुला (1964) ही कादंबरी लिहिली. “टारफुला’या कादंबरीत कोल्हापूरच्या ग्रामीण भागाचे चित्र उभे करणारी तीन पिढ्यांची कहाणी लिहिली. “कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य इतके लोकप्रिय झाले की त्याचे दोन हजार प्रयोग झाले. त्याशिवाय गल्ली ते दिल्ली, लवंगी मिरची कोल्हापूरची इ. त्यांची वगनाट्ये लोकप्रिय ठरली. ग्रामीण तमाशा त्यांनी शहरी लोकांपुढे वगनाट्यातून आणला व त्याला प्रतिष्ठाही मिळाली.

1960 ते 1968 या काळात त्यांच्या कथालेखनाला बहर आला. ग. वि. अकोलकर, ग. प्र. प्रधान यांच्या सहकार्याने इयत्ता 8 वी ते 10 वीसाठी “साहित्य सरिता’ या वाचनमालेचे संपादन केले (1968). महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषा विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांची नियुक्‍ती झाली. 1972 पासून मराठीशिवाय अन्य सहा भाषांतील पाठ्यपुस्तकांसाठी विद्यासचिव म्हणून नियुक्‍ती झाली होती.

पाटलांचा पहिला कथासंग्रह “वळीव’ 1957 मध्ये प्रसिद्ध झाला. नंतर भेटीगाठी (1930), आभाळ (1961), धिंड (1962), ऊन (1963), बावरी शेंग (1963), खुळ्याची चावडी (1964), पाहुणी (1967), फक्‍कड गोष्टी (1973), खेळखंडोबा (1974), ताजमहालमध्ये सरपंच (1977) इ. कथासंग्रह प्रसिद्ध झाले. वळीव ते ऊनपर्यंत त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहाला त्या वर्षातील उत्तम कथासंग्रह म्हणून महाराष्ट्र शासनाची परितोषिके मिळाली. “निवडक शंकर पाटील’ (1966) हा त्यांच्या प्रातिनिधिक कथांचा संग्रह. त्यांच्या कथांचे भारतीय व पाश्‍चात्य भाषांत अनुवादही झाले.

“वावटळ’ ही पटकथा लिहून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. युगे युगे मी वाट पाहिली, गणगौळण, भोळीभाबडी, चोरीचा मामला इ चित्रपटांच्या उत्कृष्ट पटकथा-संवादलेखनाबद्दल त्यांना शासकीय पुरस्कार लाभले. याशिवाय पिंजरा, केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, डोंगरची मैना, छंद प्रीतीचा, पाहुणी, लक्ष्मी इ. चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले. त्यांचे निधन 30 जुलै 1994 रोजी झाले. अभिवादन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.